मुंबई : श्रद्धा दमानी-जोआन फर्नांडिस यांनी अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत ३५ वर्षांवरील खुल्या महिला दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. याआधी नवोदित खेळाडूंच्या इंटरमीडिएट ३५ वर्षांवरील महिला दुहेरीत श्रद्धा-जोआन यांनी रौप्य पदकावर समाधान मानले होते.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेसाठी 'लोकमत' माध्यम प्रायोजक आहे. इंटरमीडिएट मिश्र दुहेरी अंतिम सामन्यात आदित पटेल-जोआन यांनी सुवर्ण पदक जिंकताना श्रेया नाईक-आशुतोष शर्मा यांना १०-३ असे नमवले. याच गटात ऋषी दर्डा आणि श्रद्धा दमानी यांनी शानदार खेळाने सर्वांना प्रभावित केले.
ऋषी दर्डा-श्रद्धा दमानी यांनी साखळी फेरीत तीनपैकी दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात साहिल गढिया-दीशा कुलकर्णी यांना १५-७ असे नमल्यानंतर ऋषी दर्डा-श्रद्धा दमानी यांनी पुढच्या सामन्यात राधेश्याम-निकिता लामा या नेपाळच्या जोडीचा १५-० असा फडशा पाडला. यानंतर अटीतटीच्या रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ऋषी दर्डा-श्रद्धा दमानी यांना आदित-जोआन या सुवर्ण विजेत्या जोडीविरूध्द ८-१५ असा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, त्याआधी, ३५ वर्षांवरील महिला दुहेरी अंतिम सामन्यात श्रध्दा दमानी-जोआन फर्नांडिस यांनी सुवर्ण पदक पटकावताना गायत्री मेवाडा-सिमरन बंगेरा यांचा ११-३ असा धुव्वा उडवला.