पुणे : केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना तब्बल ८ महिन्यानंतर रोख रक्कमेच्या बक्षिसाचे लवकरात लवकर वितरण करण्याचे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) पदाधिकाऱ्यांना दिले.‘क्रीडा पारितोषक अडकले लालफितीत’ या मथळ््याखाली लोकमतने शुक्रवारी (९ आॅक्टोबर) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर त्याच दिवशी एमओएच्या बैठकीत या वृत्तावर चर्चा झाली. त्यानंतर एमओएचे अध्यक्ष अजित पवार यांनी सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनचे सदस्य नामदेव शिरगावकर यांच्यासह क्रीडा मंत्री तावडे यांची १४ आॅक्टोबरला भेट घेतली. त्यावेळी क्रीडा मंत्र्यांनी पारितोषिकाची रक्कम लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. तसेच या वेळी क्रीडा क्षेत्रातील अन्य प्रश्नांबाबत चर्चा झाली.केरळ येथे ३५ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात ३० सुवर्ण, ४३ रौप्य व ५० कास्यपदके जिंकून आपल्या राज्याचा झेंडा फडकाविला. एमओएने मुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि राज्याच्या क्रीडा खात्याकडे पदक विजेत्या १२३ खेळाडूंना रोख पारितोषिक रक्कम देण्याचा प्रस्ताव २४ फेब्रुवारी रोजी दिला होता.हा प्रस्ताव एकूण ३ कोटी ७९ लाखाचा आहे. त्यात सुवर्ण पदक विजेत्यांना ५ लाख, रौप्य ३ व कांस्य पदकासाठी २ लाख रुपये प्रस्तावित होते. तसेच क्रीडा मार्गदर्शकांना देखील काही रक्कम पुरस्कार स्वरूपात द्यावी असा प्रस्ताव होता. (क्रीडा प्रतिनिधी)
अखेर खेळाडूंना मिळणार बक्षिसाची रक्कम
By admin | Published: October 15, 2015 11:59 PM