वेगवान गोलंदाज उमेश यादव व ईशांत शर्मा उल्लेखनीय कामगिरी करीत असून, आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महत्त्वाचे बळी घेत भारताला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान करीत आहेत, अशा शब्दांत टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. गुरुवारपासून रांचीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वेगवान गोलंदाज उमेशची प्रशंसा केली. कुंबळे म्हणाले, ‘‘उमेश ज्या वेळी गोलंदाजीला येतो त्या वेळी तो पाच बळी घेईल, असे वाटते.’’सर्व लक्ष मात्र फिरकीपटूंची जोडी आश्विन व जडेजा यांच्याकडे असते. त्यांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यांत बरीच गोलंदाजी केली असून, बऱ्याच विकेट घेतल्या आहेत.आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज उमेश व ईशांत यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगला मारा केला. भारताने या कसोटीत ७५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या लढतीत मोक्याच्या क्षणी बळी घेणारी उमेश व ईशांत जोडी मात्र प्रसिद्धीपासून दूरच राहिली. पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उमेशने भेदक मारा करताना पहिल्या डावात ४ बळी घेतले होते. ‘‘उमेशमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मायदेशात खेळताना वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरतील, अशा खेळपट्ट्या मिळाल्या नसल्या तरी त्याने अचूक मारा करीत छाप सोडली. या मोसमात तो जवळजवळ सर्वच कसोटी सामन्यांत खेळला. त्याने मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे बळी घेत आपले महत्त्व पटवून दिले.
‘उमेश नेहमी ५ बळी घेईल, असे भासते’
By admin | Published: March 15, 2017 1:21 AM