अमोल मचाले / पुणेवेगवान गोलंदाज उमेश यादव याचा भेदक मारा (३२ धावांत ४ बळी) आणि फिरकीपटूंच्या प्रभावी माऱ्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या गावसकर-बॉर्डर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होत असलेल्या या पहिल्या कसोटीत भारताने गुरुवारी दिवसखेर पाहुण्यांची अवस्था ९ बाद २५६ अशी केली.नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी पत्करणाऱ्या आॅस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर-रेनशॉ जोडीने ८२ धावांची सलामी दिली. तरीही, या संघाला त्याचा लाभ उचलता आला नाही. रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे ५९ आणि ७४ धावांत २ बळी घेऊन उमेशला चांगली साथ दिली. उर्वरित १ गडी जयंत यादवने बाद केला. आॅस्ट्रेलियातर्फे सलामीवीर रेनशॉने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तळातील फलंदाज मिशेल स्टार्कने नाबाद ५७ धावा फटकावल्यामुळे कांगारूंना अडीचशेपार मजल मारता आली. उद्या उर्वरित १ बळी झटपट मिळवून पाहुण्यांना मोठ्या धावसंख्येचे प्रत्युत्तर देऊन आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मिळत असलेली मदत पाहता, यजमानांना सामना जिंकण्याची संधी आहे. अर्थात, आॅस्ट्रेलियाचे फिरकीपटू काय करामत करतात, यावरही बरेच काही अवलंबून असेल.पहिले सत्र : ३३ षटके, ८४ धावा, १ बळीकांगारूंच्या चिवटपणावर उमेशचा उतारापहिल्या तासात वॉर्नर-रेनशॉ जोडीने भारताचे फिरकी आक्रमण सहज थोपविले होते. जगातील अव्वल कसोटी गोलंदाज असलेला आश्विनही प्रभावी वाटत नव्हता. नाही म्हणायला, ईशांतने ४ षटकांच्या आपल्या पहिल्या स्पेलमध्ये काही वेळा पाहुण्यांना अडचणीत आणले होते. १५व्या षटकात जयंत यादवने वॉर्नरला क्लीन बोल्ड केले; पण तो नो बॉल होता. शिवाय, चेंडू यष्टीला लागून सीमापार गेल्याने कांगारूंना ५ धावा अतिरिक्त मिळाल्या. १८.५ षटकांत पाहुण्यांनी अर्धशतक फळ्यावर लावले. जयंत यादव निष्प्रभ ठरतोय, हे पाहून कोहलीने जडेजाला आणले. मात्र, कांगारूंनी त्यालाही दाद दिली नाही. जडेजाने टाकलेल्या २४व्या षटकात वॉर्नरने स्क्वेअर लेगला चौकार, तर रेनशॉने मिडविकेटला उत्तुंग षटकार ठोकून कोहलीला विचार करायला भाग पाडले. १८ ते २७ या १० षटकांत वॉर्नर-रेनशॉ जोडीने षटकामागे ४च्या सरासरीने ४० धावा फटकावल्या.अखेर, कोहलीने वेगवान गोलंदाज उमेश यादवकडे चेंडू सोपविला. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या पहिल्याच षटकात धडाकेबाज वॉर्नरची शिकार केली. २८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जम बसलेला वॉर्नर फसला. आॅफ स्टंपबाहेरील गुडलेंथचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्टम्पवर आदळताच स्टेडियममध्ये उपस्थित तुरळक प्रेक्षकांनी जल्लोष केला.दुसरे सत्र : ३० षटके, ६९ धावा, ३ बळीफिरकीअस्त्र प्रभावी, पाहुणे बॅकफूटवर कर्णधार स्मिथ फलंदाजीला येऊन एक चेंडू खेळत नाही तोच रेनशॉने पोटदुखीमुळे मैदान सोडले. स्थिरावलेली जोडी गेल्याने कांगारूंची धावगती मंदावली. नेमक्या याच वेळी भारतीय फिरकीपटूंनी त्यांच्यावर आक्रमण केले. एरवी फिरकी गोलंदाजी सहजपणे खेळताना स्मिथदेखील चाचपडत होता. दरम्यान, ३८व्या षटकांत कांगारूंनी शतकाची वेस ओलांडली. २ षटकांच्या छोट्या स्पेलमध्ये उमेश यादवनेही स्मिथला सतावले. ४१व्या षटकात शॉन मार्श समोर असताना त्याने रिव्हर्स स्विंगचे अफलातून प्रात्यक्षिक दाखविले. पाचव्या चेंडूवर तर तो बाद होता-होता बचावला. अखेर जयंत यादवने मार्शची खेळी संपविली. मार्शच्या पॅड, ग्लोव्ह्ज आणि बॅटला लागून चेंडू लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या हातात विसावला. पुढच्याच षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर स्मिथविरुद्ध पायचीतचे जोरदार अपील पंचांनी नाकारले. ६१व्या षटकात जडेजाने चाचपडत खेळणाऱ्या हँड्सकोम्बला सरळ चेंडूवर पायचीत पकडले. त्या वेळी आॅस्ट्रेलियाचा स्कोअर ३ बाद १४९ असा होता. पुढच्याच षटकात आश्विनने भारताला दिवसाच्या खेळातील सर्वांत मोठे यश मिळवून देताना स्मिथला (२७ धावा, ९५ चेंडू, ४ चौकार) माघारी धाडले. आॅफ स्टंपबाहेरील सरळ चेंडू मिडविकेटला उभ्या असलेल्या कोहलीच्या हातात मारून स्मिथने विकेट फेकली. कर्णधार परतताच कांगारू बॅकफूटवर आले. तिसरे सत्र : 31 षटके 105 धावा, 5 बळीउमेशचा ट्रिपल धडाका, स्टार्कची झुंज हँड्सकोम्ब बाद झाल्यावर रेनशॉ मैदानावर परतला. त्याने जडेजाला चांगले फटके लगावून दबाव झुगारण्याचा प्रयत्न केला. तरीही कोहलीने जडेजावर विश्वास दाखवून आश्विनच्या साथीने त्याची गोलंदाजी सुरू ठेवली. जडेजाने कर्णधाराने दिलेली संधी सार्थकी लावून ६८व्या षटकात मिशेल मार्शच्या (४ धावा, १८ चेंडू) रूपात आपला दुसरा बळी नोंदविला. अजिबातही न वळलेल्या चेंडूवर जडेजाने त्याला पायचीत पकडले. आॅस्ट्रेलिया ५ बाद १६५.रेनशॉने आश्विनला फाईन लेगच्या दिशेने फ्लिकचा सुरेख चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रेनशॉ अधिक खुलून खेळत होता. हे पाहून कोहलीने उमेशला आणले. त्याने वेडला बाद करून आॅस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद १९० अशी केली. १७ चेंडूंनंतर आश्विनने रेनशॉला बाद करून आॅस्ट्रेलियाला हादरा दिला. त्यानंतर ८२व्या षटकात उमेशने कमाल केली. ओकेफी व लियॉन यांना लागोपाठ शून्यावर बाद करून आपली बळींची संख्या चारवर नेऊन ठेवली. आॅफ स्टंपबाहेरील आखूड टप्प्याच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा ओकेफीचा प्रयत्न फसला आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने आपल्या उजव्या बाजूने हवेत झेप घेऊन स्वप्नवत झेल टिपला. पुढच्याच चेंडूवर उमेशने लियॉनला पायचीत पकडले. कांगारूंनी डीआरएस घेतला; पण निर्णय भारताच्या बाजूने गेला. हेजलवूडने उमेशची हॅट्ट्रिक हुकवली. त्यानंतर स्टार्कने (नाबाद ५७ धावा, ५८ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) काऊंटर अॅटॅक करीत फिरकीपटूंना टार्गेट केले. त्याने संघाला अडीचशेचा टप्पा तर ओलांडून दिला. शिवाय अखरेच्या षटकांत चिवट फलंदाजी करून पहिल्याच दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव गुंडाळण्याचे भारताचे प्रयत्न उधळून लावले.धावफलक : आॅस्ट्रेलिया : रेनशॉ झे. विजय गो. आश्विन ६८, वॉर्नर त्रि. गो. उमेश यादव ३८, स्टीव्ह स्मिथ झे. कोहली गो. आश्विन २७, शॉन मार्श झे. काहली गो. जयंत यादव १६, हँड्सकोम्ब पायचीत गो. जडेजा २२, मिशेल मार्श पायचित गो. जडेजा ४, वेड पायचित गो. यादव ८, मिशेल स्टार्क खेळत आहे ५७, ओकेफी झे. साहा गो. यादव ०,लिआॅन पायचित गो. उमेश यादव ०, हेजलवूड खेळत आाहे १.एकूण : ९४ षटकांत ९ बाद २५६.गोलंदाजी : ईशांत ११-०-२७-०, आश्विन ३४-१०-५९-२, जयंत यादव १३-१-५८-१,जडेजा २४-४-७४-२, उमेश यादव १२-३-३२-४.रेनशॉच्या ‘ब्रेक’वर बॉर्डर यांची टीकासिडनी : सलामीवीर मॅट रेनशॉ याने सामन्यादरम्यान शौचास जाण्यासाठी घेतलेल्या ब्रेकवर आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी टीका केली आहे. वॉर्नर बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूनंतर रेनशॉने शौचास जाण्यासाठी मैदान सोडले. यासंदर्भात पंचांशी आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत चर्चा करून तो पॅव्हेलियनमध्ये निघून गेला. यावर बॉर्डर म्हणाले, ‘‘असा प्रकार मी पूर्वी कधीच पाहिला नाही. कर्णधार म्हणून अशी गोष्ट मला नक्कीच आवडली नसतीे.’’उमेश यादव हा जुना चेंडू प्रभावी रीतीने रिव्हर्स स्विंग करतो. ही कला माहीत असल्यामुळे आम्ही जाणीवपूर्णक त्याला उशिरा गोलंदाजीला आणले. रणनीतीचा हा भाग होता. यात आम्ही यशस्वी ठरलो.- संजय बांगर, सहायक प्रशिक्षक
उमेश यादवचे ४ बळी : आॅस्ट्रेलिया ९ बाद २५६; पहिला दिवस भारताचा
By admin | Published: February 24, 2017 1:24 AM