हैदराबाद : बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी व जयदेव उनाडकटची अखेरच्या षटकातील मेडन ओव्हर हॅट््ट्रिक याच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघाचा १२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे पुणे संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.पुणे सुपरजायंटने ८ बाद १४८ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव ९ बाद १३६ धावांत रोखला. पुणे सुपरजायंंटतर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या स्टोक्सने (३९) गोलंदाजीमध्ये ३० धावांच्या मोबदल्यात डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन व केन विल्यम्सन या प्रमुख फलंदाजांना माघारी परतवले. उनाडकटने ३० धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्यात अखेरच्या षटकामध्ये नोंदवलेल्या हॅट््ट्रिकचा समावेश आहे. हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. हैदराबादतर्फे युवराज सिंगने ४३ चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या आणि कर्णधार वॉर्नरने ३४ चेंडूंमध्ये ४ चौकार व १ षटकारासह ४० धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त केवळ शिखर धवनला (१९) दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. वॉर्नर व युवराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुणे संघाने विश्वासपात्र फलंदाज राहुल त्रिपाठीला (१) दुसऱ्याच षटकात गमावले. त्याला बिपुल शर्माने धावबाद केले. सलामीवीर अजिंक्य रहाणे (२२) व कर्णधार स्टीव्ह स्मिथ (३४ धावा, ३९ चेंडू) यांनी सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. बिपुल शर्माने रहाणेला तंबूचा मार्ग दाखवित संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर बेन स्टोक्सने ३९ धावांची आक्रमक खेळी करताना स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. स्टोक्सच्या २५ चेंडूंच्या खेळीमध्ये एक चौकार व तीन षटकारांचा समावेश आहे. महेंद्रसिंह धोनीने २१ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. दुसऱ्या टोकाकडून मात्र त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. अखेरच्या दोन षटकांत पुणे संघाचे तीन फलंदाज बाद झाले. (वृत्तसंस्था)धावफलकरायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे झे. युवराज गो. बिपुल शर्मा २२, राहुल त्रिपाठी धावबाद १, स्टीव्ह स्मिथ झे. बिपुल शर्मा गो. कौल ३४, बेन स्टोक्स त्रि. गो. राशिद खान ३९, महेंद्रसिंह धोनी झे. ओझा गो. कौल ३१, डॅनियल ख्रिस्टियन झे. राशिद गो. कौल ०४, मनोज तिवारी धावबाद ०९, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ०१, शार्दुल ठाकूर झे. वॉर्नर गो. कौल ००, जयदेव उनाडकट नाबाद ००. अवांतर (७). एकूण : २० षटकांत ८ बाद १४८. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३९-०, नेहरा १.१-०-५-०, कौल ४-०-२९-४, राशिद खान ४-०-१८-१, हेन्रिक्स २.५-०-१५-०, बिपुल शर्मा ४-०-३९-१.सनरायझर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर झे. ठाकूर गो. स्टोक्स ४०, शिखर धवन त्रि. गो. स्टोक्स १९, केन विल्यम्सन झे. धोनी गो. स्टोक्स ०४, युवराज सिंग झे. त्रिपाठी गो. उनाडकट ४७, मोझेस हेन्रिक्स त्रि. गो. ताहिर ०४, नमन ओझा झे. स्टोक्स गो. उनाडकट ०९, बिपुल शर्मा झे. स्टोक्स गो. उनाडकट ०८, राशिद खान झे. व गो. उनाडकट ०३, भुवनेश्वर कुमार झे. तिवारी गो. उनाडकट ००, सिद्धार्थ कौल नाबाद ००, आशीष नेहरा नाबाद ००. अवांतर (२). एकूण : २० षटकांत ९ बाद १३६. गोलंदाजी : उनाडकट ४-१-३०-५, सुंदर ३-०-१९-०, स्टोक्स ४-०-३०-३, ताहिर ४-०-२४-१, ठाकूर २-०-१२-०, ख्रिस्टियन ३-०-२१-०.
उनाडकटची हॅट््ट्रिक, पुणे सुपरजायंट विजयासह दुसऱ्या स्थानी
By admin | Published: May 07, 2017 12:42 AM