ऑनलाइन लोकमत
पोर्ट एलिझाबेथ, दि. 28 - कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. मात्र आज कसोटी क्रिकेटमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला आज नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि हा विक्रम नोंदवला गेला. कसोटी क्रिकेटमध्ये पायचीत होणारा हाशिम अमला हा दहा हजारावा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पोर्ट एलिझाबेथ कसोटीदरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा विक्रम नोंदवला आहे.
श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावांत गुंडाळून दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी केली. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अमलाने 48 धावांची खेळी केली. मात्र डावातील 51 व्या षटकात अमला नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर चकला आणि पायचीत होऊन माघारी परतला. त्याबरोबरच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज पायचित होण्याचा हा दहा हजारावा प्रसंग ठरला.