नागपूर : इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.रविवारी येथे सुरू झालेल्या सब ज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेले कवळी यांनी ४९ किलो गटात सुवर्ण जिंकणारा अमित पांगल याचे कौतुक केले. अमित अप्रतिम बॉक्सर असल्याचे सांगून कवळी म्हणाले, ‘आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनला नमविणारा अमित देशाचे भविष्य आहे. विकास कृष्णनदेखील सुवर्णाचा दावेदार होता; पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे अखेर कांस्यवर समाधान मानावे लागले. भारताला आशियाडमध्ये केवळ दोनच पदकांची कमाई झाली.या कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचाराताच ते म्हणाले, ‘मुळीच नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी नऊ पदके मिळाली होती. राष्टÑकुल आणि आशियाड यामध्ये कमालीचा फरक असला तरी किमान चार पदकांची अपेक्षा होती. कुठे चूक झाली याची समीक्षा आम्ही लवकरच करणार आहोत.’ महाराष्ट्रातूनही उत्तम बॉक्सर पुढे येत असल्याचे सांगून, मुंबईत बीएमसीच्या शाळांमधील बॉक्सिंग प्रयोग राज्यात सर्वत्र राबविण्याचा मानस असल्याचे कवळी म्हणाले. राज्यातील १८ जिल्ह्यांत बॉक्सिंगचे जाळे विणले असून, जवळपास ५५ रिंक उपलब्ध असल्याची माहिती कवळी यांनी दिली.मेरिकोम, सरितांचा पर्याय शोधण्याची मोहीमबीएफआयने आयोजित केलेल्या पहिल्या सब ज्युनियर मुलींच्या स्पर्धा आयोजनामागील हेतू सांगताना कवळी म्हणाले, ‘मेरिकोम किंवा सरिता यानंतरही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला बॉक्सर्स हव्या असतील तर शोधमोहिम राबविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यातील आॅलिम्पिक स्टार्सचे बीजारोपण होत असून, २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी युवा बॉक्सर मिळणार आहेत.’ सध्याच्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील सात बॉक्सरची निवड केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. अमित पांघलने मिळवलेले एकमेव सुवर्ण पदक हीच काय ती भारतासाठी जमेची बाब ठरली. तसेच, मोक्याच्यावेळी विकास कृष्ण जखमी झाल्याचाही फटकाही भारताला बसला. दुखापतीमुळे विकासला रिंगमध्ये उतरण्यास शक्य न झाल्याने त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले.
Asian Games 2018: बॉक्सिंगमधील कामगिरीबद्दल असमाधानी; बीएफआय महासचिव जय कवळी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:09 AM