विश्वास चरणकर, कोल्हापूर
क्रिकेट विश्वातील सर्वांत बेभरवशाचा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे, तो पाकिस्तानचा संघ २0 वर्षांपासून दुसर्यांदा विश्वचषक पटकावण्यासाठी उत्सुक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान संघाचा भाग असलेल्या पाकिस्तानला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच कसोटीचा दर्जा मिळाला. अत्यंत लढवय्या अशी ख्याती असलेला हा संघ विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीपासून स्पर्धेत सहभागी होत आहे. तेजतर्रार गोलंदाजांची फळी आणि चिवट फलंदाजी हे पाकिस्तान संघाचे नेहमीच बलस्थान राहिले आहे. १९९२मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत केवळ नशिबाच्या जोरावर उपांत्यफेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वविजेतेपदाची चव चाखली होती.
पाकिस्तान क्रिकेटच्या दुर्देशेला तेथील राजकीय परिस्थितीही कारणीभूत ठरली आहे. देशात सतत होणारे अतिरेकी हल्ले आणि बॉम्बस्फोट यांमुळे कोणताही देश या देशाचा दौरा करण्यास नाखूष असायचा. त्यात २00९मध्ये पाकिस्तान दौर्यावर गेलेल्या श्रीलंका संघावर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हापासून एकाही देशाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. या घटनेमुळे त्यांचे २0११च्या विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपदही गेले. पीसीबीला त्यांच्या मालिका त्रयस्त देशात यूएईमध्ये खेळवाव्या लागत आहेत. गेली ५ वर्षे मायदेशात क्रिकेटला हा संघ मुकला आहे. त्यांच्या वाट्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटही कमी येते. असे असूनही कोणत्याही स्पर्धेत आणि कोणत्याही सामन्यात ते खतरनाक ठरू शकतात. त्यांच्या कामगिरीबद्दल भाकीत करणे अतिशय कठीण. याचे उदाहरण म्हणजे १९९२चा वर्ल्डकप. इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने पहिल्या पाचपैकी ३ लढती गमावल्या होत्या; त्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर जातील, अशी परिस्थिीती होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ ७४ धावांत गुंडाळला गेला. आठ षटकांत इंग्लंडने १ बाद २४ धावा केल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहजपणे जिंकणार, अशी परिस्थिती असताना धुवाधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहून दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. या एका गुणाच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरीत चौथा संघ म्हणून प्रवेश मिळविला आणि तेथून पुढे मग पाकिस्तानने झंझावती खेळ करून विश्वविजयाचा मुकुट परिधान केला.
उज्ज्वल तितकीच काळी परंपरा
च्पाकिस्तानला प्रतिभावान खेळाडूंची नेहमीच चांगली परंपरा राहिली आहे. इम्रान खान, जावेद मियाँदाद, रमीझ राजा, वसिम अक्रम, वकार युनूस, इजाज अहमद, आमीर सोहेल, सलीम मलिक, सर्फराज नवाझ, इंझमाम उल् हक, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद, शाहीद आफ्रिदी, मिसबाह उल् हक, युनीस खान यासारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपली चमक दाखविली आहे.
च्संघात अनेक गुणी खेळाडूंचा समावेश असतानाही संघाची कामगिरीही नेहमीच बेभरवशाची राहिली आहे. आज जिद्दीने खेळून विजय खेचून आणणारा संघ पुढच्याच सामन्यात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. संघातील गटबाजी, खेळाडूंची बेदिली, बेशिस्तपणा हा त्या संघाला लागलेला शाप आहे. बॉल टॅम्परिंगची ‘काळी कला’ पाकिस्ताननेच जगाला शिकविली. स्पॉट फिक्सिंगमध्ये सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमीर या तीन खेळाडूंना शिक्षा झाल्यामुळे या संघाची क्रिकेट जगतात चांगलीच बदनामी झाली आहे.
युवा-अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण
२0१५च्या विश्वचषकात पाकिस्तानचे अभियान पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या लढतीने होत आहे. विश्वचषकात पाकिस्तान अजून भारताला एकदाही हरवू शकलेला नाही. हा इतिहास बदलण्याचा ते दर वेळी प्रयत्न करतात; पण त्यांना यश मिळत नाही. यंदा या सामन्यावरच दोन्ही संघांची स्पर्धेतील वाटचाल अवलंबून आहे.
यंदाच्या विश्वचषकात उतरणार्या पाकिस्तानी संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. संघाची धुरा मिसबाह उल् हक या परिपक्व खेळाडूच्या हाती आहे. आतापर्यंत पाचवा वर्ल्डकप खेळणारा शाहीद आफ्रिदी हा संघातील हुकमी एक्का आहे.
लेगब्रेक आणि गुगली गोलंदाजी करणारा आणि फिनिशर म्हणून दे दणादण फलंदाजी करणारा आफ्रिदी, मधल्या फळीत खेळणारा युनीस खान, यष्टिरक्षक फलंदाज उमर अकमल या अनुभवी फलंदाजांबरोबच सलामीवीर अहमद शहजाद, इशान आदील, मोहंमद हाफीज, हॅरिस सोहेल यासारख्या खेळाडूंमुळे पाकिस्तानी फलंदाजी सरस ठरते.
पाकिस्तानची जमेची बाजू असलेल्या गोलंदाजीला इम्रान, वसिम, वकार, शोएब या चौकडीसारखी आता धार नसली तरी आजची फळी न्यूझीलंड, आस्ट्रेलियातील ‘बाउन्सी विकेट’वर कधीही घातक ठरू शकतात. सात फूट उंचीचा मोहंमद इरफान याच्यासह सोहेल खान, वहाब रियाझ हे जलदगती गोलंदाज स्विंग करण्यात ‘माहीर’ आहेत. पण, याच्या दृष्टीने महत्त्चाची बाब म्हणजे या सर्वांना वर्ल्डकपसारख्या मोठय़ा स्टेजवर खेळण्याचा अनुभव कमी आहे; पण
जिद्द आणि चिवटपणाच्या जोरावर १९९२ची ऑस्ट्रेलियातील पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियातच करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असणार आहे.