अंडर १८ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताचा धावपटू नितीन गुप्ताने ५००० मीटर रेसवॉक स्पर्धेतील अंतिम फेरीत शर्यत जिंकण्याआधीच सेलीब्रेशन केले आणि पाठीमागचा खेळाडू त्याच्या पुढे निघून गेला. अवघ्या ०.०१ सेकंदाने भारताचे सुवर्णपदक हुकले. या स्पर्धेत चीनने सुवर्णपदकावर नाव कोरले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा धावपटू नितीन गुप्ताची चीनच्या झू निंघाओशी शर्यत होती. या शर्यतीत नितीनने सुमारे ५० मीटरची आघाडी घेतली होती. नितीन विजयाच्या अगदी जवळ होता. परंतु, शर्यत संपण्यापूर्वीच त्याने सेलीब्रेशन केले, ज्याचा फायदा चिनी खेळाडूने घेतला. झू निंघाओने नितीनआधी ०.०१ शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले आणि नितीनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
१७ वर्षीय नितीनच्या नावावर एक जागतिक विक्रमही नोंदवला गेला आहे. त्याने ५००० मीटर रेसवॉक १९:२४.४८ सेकंदात पूर्ण केला आहे. हा २० वर्षांखालील जागतिक विक्रम आहे. त्याने पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत हा विक्रम केला.