ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. ९ - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्मात असलेला ऋषभ पंतला अवघ्या १४ धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार ईशान किसनही लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद २७ अशी बिकट झाली होती. पण सर्फराज खान आणि अनमोलप्रीत सिंग यांच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला.
भारताकडून अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक (७२), सर्फराज खान (५९) आणि वॉशिंगटन सुंदरने (४३) धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. पन्नास षटकांच्या अखेरीस भारताला ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६७ धावा करता आल्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेकडून पी.मेंडिस(३९), शामू अशान(३८) यांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा खेळपट्टीवर निभाव लागला नाही. भारताकडून मयांक डागर याने भेदक गोलंदाजी करत ५.४ षटकांत २१ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या, तर आवेश खान याने ९ षटकांत ४१ धावा देऊन २ विकेट्स मिळवल्या. के.अहमद, राहुल बाथम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, दुसऱया उपांत्य फेरीत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात विजयी ठरणाऱया संघाची अंतिम फेरीत भारताशी लढत होईल.
भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. भारताने साखळी फेरीत आयर्लंड, न्यूझीलंड आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर नामिबियाचा १९७ धावांच्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे २६६ व ३०४ धावा फटकावल्या आहेत. भारतीय संघाचे हे दोन प्रमुख फलंदाज आहेत.