नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्याने दीड वर्ष काम करणे आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचे मत रवी शास्त्री यांनी नोंदविले आहे. कराराचे नूतनीकरण करणार का, यावर मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. भारतीय संघासोबतच्या त्यांच्या कार्यकाळाबद्दल विचारताच शास्त्री म्हणाले, ‘मी आधी ज्या संघाचा खेळाडू राहिलो त्याच संघाचा संचालक म्हणून १८ महिने काम सांभाळणे संस्मरणीय ठरले. या दरम्यान जे काही निष्पन्न झाले ते आयुष्यात सर्वांत अविस्मरणीय म्हणावे लागेल. याचे श्रेय खेळाडूंना जाते.’बीसीसीआयने जाहिरात दिल्यास मुख्य कोच पदासाठी अर्ज करणार का, असा सवाल करताच शास्त्री यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी केवळ आयपीएल फायनलच्या अॅक्रिडेशनसाठी अर्ज करणार आहे.’आॅगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडला १-३ ने मालिका गमविल्यानंतर शास्त्री यांनी संचालकपद सांभाळले. ते यंदा टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर होते. जुन्या स्मृतींना उजाळा देत ते म्हणाले,‘१९८३ चा विश्वकप आणि १९८५ची विश्व क्रिकेट चॅम्पियनशिप स्मरणात आहेत. पण, संघासोबत घालविलेले १८ महिने त्याहून विशेष ठरले. इंग्लंडला वन-डेत त्यांच्याच भूमीत नमविले. टी-२० तही इंग्लंडचा व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेत २२ वर्षानंतर मालिका जिंकली. द. आफ्रिकेला एका दशकानंतर कसोटी मालिकेत पराभूत केले.’ या मालिकांमध्ये विशेष अशी कुठली मालिका होती, या प्रश्नाच्या उत्तरात शास्त्री यांनी ‘मी तुलना करणार नाही. निर्णय चाहत्यांना घ्यायचा आहे.’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)कोहलीला वन-डे संघाचे कर्णधारपद देखील सोपवायला हवे का, या पश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून शास्त्री म्हणाले, ‘मी काय सांगावे. कोहली केवळ २७ वर्षांचा आहे. त्याचे करिअर बराच काळ चालणार आहे.’ आपल्या कार्यकाळात अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांनी विशेष मेहनत घेत वेगवान सुधारणा केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
टीम इंडियासोबत दीड वर्षांची सोबत अविस्मरणीय : शास्त्री
By admin | Published: May 27, 2016 4:01 AM