Roger Stockton: Formula 1 पासून Moto GP पर्यंत कार रेसिंग असो किंवा बाईक रेसिंग असो, सर्व शर्यती चाहत्यांना भुरळ घालतात. या खेळांमध्ये जितका थरार असतो तितकेच ते ड्रायव्हरसाठी घातक असतात. अनेक वेळा अशा शर्यतीत मोठे जीवघेणे अपघात होतात. त्यात चालकाचा जीवही जातो. असाच एक दुर्दैवी प्रकार एका बाप-लेकासोबत घडला आणि कार रेसिंगमध्ये पिता-पुत्राला जीव गमवावा लागला. हा अपघात आयल ऑफ मॅन टीटी (Isle of Man TT) शर्यतीदरम्यान घडला. या इव्हेंटमध्ये, ५६ वर्षीय रॉजर स्टॉकटन आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा ब्रॅडली यांचा शुक्रवारी साइडकार रेसिंग (Sidecar Race) च्या दुसऱ्या लॅपदरम्यान (दुसऱ्या फेरीच्या शर्यतीत) मृत्यू झाला.
प्रथमच रेसिंगमध्ये सामील झाला होता ब्रॅडली
साइड कार रेसिंगमध्ये 3-चाकी बाईक-कार वापरली जाते. त्याचा वेग २६० किमी प्रतितास इतका असू शकतो. रॉजर हा एक अनुभवी रेसर होता तर त्याचा मुलगा ब्रॅडली प्रथमच या शर्यतीत भाग घेत होता. रॉजर आणि ब्रॅडली हे इंग्लंडचे रहिवासी होते. 'आयल ऑफ मॅन टीटी'ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत दुःखाने सांगावे लागते की वडील-मुलगा रॉजर आणि ब्रॅडली यांचा अपघाती मृत्यू झाला. रॉजर हा अनुभवी टीटी रेसर होता. ही त्याची २०वी शर्यत होती. रॉजरने २००० ते २००८ पर्यंत सतत या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यानंतर रॉजरने २०१०, २०१७ या वर्षी या स्पर्धेत भाग घेतला होता.
यावर्षी या स्पर्धेत एकूण ५ जणांचा झालाय मृत्यू
'ऑटोस्पोर्ट डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी या स्पर्धेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. साइड कार ड्रायव्हर सीझर चॅनेलचा गेल्या शनिवारी ३७.७३ च्या रेस कोर्सवर मृत्यू झाला. रॉजर आणि ब्रॅडली होते त्याच ठिकाणी त्याचाही मृत्यू झाला. या शिवाय मार्क पर्स्लो आणि डेव्ही मॉर्गन नावाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की ही 'आयल ऑफ मॅन टीटी' शर्यत बेटावरील सार्वजनिक रस्त्यावर होते.