मुंबई : ‘कर्करोग हा अंत नाही, या आजारातूनही होऊ शकते नवी सुरुवात’ अशा आशयाचा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दिला. रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ३१ जणांनी सहभाग घेतला. त्यातील १२ जण विविध वयोगटांतील कॅन्सर सर्व्हायव्हर्स होते. या सर्वांनी यशस्वीरीत्या ही दौड पूर्ण करत, अन्य कर्करोग रुग्णांसाठी व समाजासाठी आदर्श घालून दिला. ‘लोकमत’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.यात डोळ्याच्या कर्करोगावर मात केलेली ३० वर्षांची प्रीती फड ही तरुणी १० किलोमीटर अंतर धावली. सोसायटीच्या वतीने राइज अगेन्स्ट कॅन्सर मोहिमेच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. याविषयी, सोसायटीचे विश्वस्त नवीन क्षत्रिय यांनी सांगितले की, कर्करोगाचे निदान झाले की, रुग्णावर मानसिक आघात होतो. त्यामुळे आता आयुष्य संपले, या भावनेतून हे रुग्ण नकारात्मक आणि निराशावादी जीवन जगतात. मात्र, सोसायटीच्या वतीने ही भावना पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कर्करोगातून बरे झालेले रुग्णांनाच या उपक्रमाचा चेहरा बनविला आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून ‘उगम’ या कॅन्सर सर्व्हायव्हलच्या संस्थेतील रुग्णांनी कर्करोगावर मात करण्याची जिद्द बाळगण्याचा संदेश दिला.
कॅन्सर सर्व्हायव्हर्सचा अनोखा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:57 PM