जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बराच वाद झाला अन् जागतिक कुस्ती महासंघाला हस्तक्षेप करावा लागला होता. WFI योग्य वेळेत निवडणूक घेण्यात अयशस्वी ठरल्याने UWW ने गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी WFI ला तात्पुरते निलंबित केले होते. भारतीय कुस्ती महासंघातील वाद चव्हाट्यावर आला. तत्कालीन अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी गंभीर आरोप केले आहेत. ब्रीजभूषण यांनी महिला खेळाडूंसह प्रशिक्षकांचा लैगिंक छळ केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे ते पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकले नाहीत.
दरम्यान, जागतिक कुस्ती महासंघाने निलंबनाचा पुढील आढावा घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली आणि सर्व घटक आणि माहिती विचारात घेतल्यानंतर निलंबन उठवण्याचा निर्णय घेतला. जागतिक कुस्ती महासंघाने अखेर भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्यामागचे कारण समोर आले होते. या संदर्भात जागतिक कुस्ती महासंघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. कारण भारतीय महासंघ वेळेवर निवडणुका घेण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते.
देशाच्या झेंड्याखाली खेळणार पैलवानजागतिक कुस्ती महासंघाने सांगितले की, भारतीय कुस्ती महासंघाने UWW ला लेखी हमी देणे आवश्यक आहे की, कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व WFI स्पर्धा, ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी कुस्तीपटूंचा विचार केला जाईल. ज्या तीन कुस्तीपटूंनी माजी WFI प्रमुखांच्या (ब्रीजभूषण शरण सिंह) चुकीच्या कृतींना विरोध केला होता त्यांचाही समावेश केला जाईल. जागतिक कुस्ती महासंघ कुस्तीपटूंच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांत त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. यामुळे पुढील UWW स्पर्धेत भारतीय पैलवान त्यांच्या देशाच्या झेंड्याखाली खेळू शकतात हे स्पष्ट होते.