इस्लामपूर (सांगली) : पुण्याच्या प्रभाकर असमत अकॅडमीने यजमान एस. डी. पाटील ट्रस्टचा ५-२ अशा फरकाने पराभव करत आंतरराज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील सुवर्णचषक पटकावला. यजमान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघास २५ हजार रुपये रोख आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात आले. असमत अकॅडमीचा कुणाल जगदाळे सामनावीर बहुमानाचा मानकरी ठरला.येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. मंगळवारी सकाळी उपांत्य फेरी, तर दुपारी अंतिम फेरीचा सामना झाला. उपांत्य सामन्यात इस्लामपूरने कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा १-० असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली, तर पुण्याच्या असमत अकॅडमीने मेट्रो पुणेवर ४-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. इस्लामपूरचा अजित शिंदे व आयुब पेंढारी (पुणे) सामनावीर ठरले.सायंकाळी असमत पुणे व इस्लामपूर यांच्यातील अंतिम सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटापासून आक्रमक राहिलेल्या दोन्ही संघांच्या आक्रमण फळीतील खेळाडूंनी परस्परांच्या गोलक्षेत्रात धडक मारून दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला. आठव्या मिनिटाला पुण्याच्या कुणाल जगदाळे याने पहिल्या गोलची नोंद करत इस्लामपूरवर दडपण वाढवले. २४ व्या मिनिटाला संजय महाबरी याने दुसऱ्या गोलची नोंद केली. त्यानंतर पुण्याच्या आयुब पेंढारीने स्वत:च्या व्यक्तिगत ३ गोलची नोंद करत आघाडी वाढवली. इस्लामपूरच्या विनायक पाटील याने ३८ व्या मिनिटाला पहिला गोल, तर महेश खांबे याने ५४ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. निर्धारित वेळेत पुण्याच्या संघाने उत्कृष्ट पासिंग, डॉजिंगचा वेगवान खेळ करत विजेतेपदावर नाव कोरले. विजेत्या संघाला आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. उपविजेत्या इस्लामपूरला २१ हजार रुपये व रौप्यचषक देण्यात आले. यावेळी अॅड. बी. एस. पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, विलासराव पाटील, संपतराव पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, सखाराम जाधव, सर्जेराव यादव, शहाजी पाटील, कुमार आगळगावकर उपस्थित होते. संजय चव्हाण, संजय चरापले, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, जयवंत जाधव, शंतनू पाटील यांनी संयोजन केले. राष्ट्रीय हॉकीपटू संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. जाधव, संदीप साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. ए. नारायणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
असमत अकॅडमी विजेते
By admin | Published: January 28, 2016 12:54 AM