नवी दिल्ली : देशातील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टॅलेंट सर्च पोर्टल’चे अनावरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. गावागावांतील मुलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, त्यांची गुणवत्ता देशापुढे यावी, हा या पोर्टलचा उद्देश आहे.या व्हिडिओ पोर्टलवर कोणताही मुलगा किंवा मुलगी तसेच त्याचे आई-वडील, शिक्षक किंवा प्रशिक्षक त्यांचा बायोडाटा अपलोड करू शकतात. क्रीडा मंत्रालयाकडून मुलांची निवड केली जाईल. कौशल्यवान मुलांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रांत प्रशिक्षण दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात या पोर्टलचा उल्लेख केला होता.पोर्टलचे अनावरण झाल्यानंतर नायडू म्हणाले, सर्वच राज्यांत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत रचना महत्त्वाची आहे. कमी वयाच्या खेळाडूंचा शोध घेत त्यांना पुढे आणणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक भागात प्रशिक्षण अकादमी आणि केंद्र उभारण्याची गरज आहे. सांघिक खेळाच्या रूपात आपणास क्रिकेट आणि हॉकी याशिवाय इतर खेळांत वैयक्तिक प्रयत्नांच्या जोरावर यश मिळाले. यात राज्याचे प्रोत्साहन अणि संरक्षणची भूमिका नव्हती. यात बदल व्हायला हवा. सानिया मिर्झा, पी व्ही. सिंधू, सायना नेहवला, पी. टी. उषा, मिल्खा सिंग आणि अभिनव बिंद्रा यांच्या कामगिरीवर आम्हाला गर्व आहे. या पोर्टलमुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल. निवडलेल्या खेळाडूंना साईकडून उत्तम सुविधा मिळतील. अधिकाधिक खेळाडू याकडे वळतील आणि देशाला दर्जेदार खेळाडू मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टॅलेंट सर्च पोर्टल’चे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:57 AM