नागपूर : मोहाली कसोटी सामन्यात विजय मिळवीत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळविणाऱ्या भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केले. मुरली विजयने पदार्पणाची कसोटी याच मैदानावर खेळली होती. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या, बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने सोमवारी कसून सराव केला. सरावादरम्यान भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवरून त्याची प्रचिती आली. सोमवारी सरावापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना विजय म्हणाला, ‘संघातील प्रत्येक खेळाडूचे मनोधैर्य उंचावलेले आहे. पहिल्या लढतीत विजय मिळविल्यानंतर पावसाच्या व्यत्ययापूर्वी बंगलोर कसोटीतही आम्ही वर्चस्व राखले होते. फलंदाजी आमच्यासाठी चिंतेचा विषय नसून सूर गवसण्यासाठी एक चांगली खेळी पुरेशी आहे. उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या लढतीत प्रत्येक खेळाडूला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.’ द. आफ्रिका मोहाली कसोटीत १८४ व १०९ धावांत गारद झाला. भारताने या लढतीत विजय मिळवीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर बंगलोर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावांत गुंडाळला होता. (क्रीडा प्रतिनिधी)जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध या मालिकेत आतापर्यंत आम्ही वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलो. त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही आव्हान पेलण्यास यशस्वी ठरलो. त्यामुळे एकूण विचार करता ही मालिका चुरशीची आहे.विजय पुढे म्हणाला, ‘आमच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज दडपणाखाली आले. गोलंदाजांचे यश आमच्यासाठी सुखावणारी बाब ठरली.’या मालिकेत तीन डावांमध्ये ७५, ४७ आणि नाबाद २८ धावांची खेळी करणारा विजय स्वत:च्या फॉर्मबाबत बोलताना म्हणाला, ‘मी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. त्यात आतापर्यंत यशस्वी ठरलो. या मालिकेत कामगिरी उल्लेखनीय ठरत असून, संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावण्यात यश आले तर विशेष आनंद मिळतो.’खेळपट्टी अद्याप बघितली नसून ‘स्पोर्टिंग विकेट’ असेल, अशी आशा आहे. कसोटी असो वा वन डे क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात छाप सोडण्यास प्रयत्नशील असतो, असेही विजय म्हणाला.कसोटी मालिकेत एबी डिव्हिलियर्सचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंना यशस्वी तोंड देता आले नाही. या मैदानावर पदार्पणाची कसोटी खेळणारा विजय म्हणाला, ‘या मैदानाला माझ्या कारकिर्दीत वेगळे महत्त्व आहे. कारण या मैदानावर मी पदार्पणाची लढत खेळलो होतो. येथील ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला म्हणजे वेगळे फिलिंग येते.’रवींद्र जडेजाबाबत बोलताना तो म्हणाला, ‘जडेजा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो चांगली गोलंदाजी व फलंदाजी करतो, त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार आहे. त्याने शानदार पुनरागमन केले.’मोहाली कसोटीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे खेळाडूंना काही फरक पडतो का, याबाबत बोलताना विजय म्हणाला, ‘त्यामुळे विशेष फरक पडत नाही. खेळताना बऱ्याच बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आम्ही गर्दीचा विचार करीत नाही; पण सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी असली तर विशेष आनंद मिळतो.’
प्रत्येकाचे मनोधैर्य उंचावलेले
By admin | Published: November 24, 2015 12:26 AM