- रोहित नाईक, मुंबईगतवर्ष भारतीय हॉकीसाठी शानदार ठरले. सिनिअर पुरुष संघाने रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपुर्व फेरीपर्यंत धडक मारली. ज्यूनिअर संघाने विश्वचषकावर कब्जा केला, तर महिला संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. त्यामुळे येणारा काळ भारतीय हॉकीसाठी नक्कीच शानदार ठरेल, असा विश्वास भारताच्या ज्यूनिअर संघाचा कर्णधार हरजित सिंग याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरजितच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या ज्यूनिअर संघाने गेल्यावर्षी विश्वचषक पटकावला. सध्या हॉकी लीग स्पर्धेत दिल्ली वेव रायडर्स संघाकडून हरजित खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अनुभवाबाबत हरजित म्हणाला की, ‘ज्यूनिअर विश्वचषक स्पर्धेचा अनुभव खूप चांगला होता. प्रशिक्षक हरिंदर सिंग आणि सिनिअर संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्याकडून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. भविष्यात याचा खूप फायदा मिळेल. कर्णधार म्हणून खेळाडूंमध्ये संघ भावना, शिस्त कशी आणायची हे शिकलो. सर्व खेळाडू स्पर्धात्मक खेळले असल्याने प्रत्येकाकडे अनुभव होता. त्यामुळे फार काही अडचणी आल्या नाहीत.’ त्याचप्रमाणे, ‘सध्या भारताच्या सिनिअर संघात स्थान मिळवणे माझे मुख्य लक्ष्य आहे. आगामी जागतिक स्पर्धेत आणि टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेत मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्यास मी प्रयत्नशील आहे. यात मी यशस्वी नक्की ठरेल,’ असा विश्वासही हरजितने व्यक्त केला. ज्यूनिअर विश्वचषक पटकावल्यानंतर आयुष्य बदलल्याचे सांगताना हरजित म्हणाला की, ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉकी भारतात पुन्हा आली, याचा आनंद आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली. शिवाय भारतीय संघाच्या कामगिरीमुळे युवा खेळाडू हॉकीकडे अधिक गांभिर्याने पाहू लागले. तसेच, हॉकी लीग स्पर्धेतून प्रत्येक युवा खेळाडू मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.’ लीग स्पर्धेचा फायदा घ्यावासध्या सुरु असलेल्या हॉकी लीगबाबत हरजीत म्हणाला, ‘या लीगचा भारतीय खेळाडूंनी फायदा घ्यावा. खूप कमी देशांमध्ये लीग होत असल्याने भारतीयांकडे संधी आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही लीग अत्यंत फायदेशीर आहे. तसेच आर्थिक बाजू सक्षम करण्यासही या लीगची खेळाडूंना मदत होत आहे. जवळपास सर्वच खेळाडू सर्वसामान्य घरातून आलेले असल्याने त्यांना आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.लीगमध्ये परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव जबरदस्त आहे. त्यांच्यासोबत खेळण्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. याचा सर्वाधिक फायदा युवा खेळाडूंना आहे. मोठमोठ्या सामन्यांतील दबावाला कसे सामोरे जावे यासारख्या टीप्स आणि खूप काही त्यांच्याकडून शिकण्यास मिळतात. - हरजितसिंग
आगामी काळ भारतीय हॉकीसाठी शानदार ठरेल
By admin | Published: February 01, 2017 4:52 AM