मुंबई : मुंबई मॅरेथॉन महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उरणच्या २३ वर्षीय सुप्रिया पाटीलने. केगाव या छोट्या गावातील सुप्रियाने यंदाच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत १:२६:४८ सेकंद अशी वेळ देत कांस्यपदक मिळवले. प्रथम व द्वितीय क्रमांकावरील धावपटूंच्या तुलनेत सुप्रिया पिछाडीवर असली, तरी अनवाणी पायाने धावण्याची सवय असून, या स्पर्धेत ती बूट घालून धावल्याने तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. ती अनवाणी धावली असती तर नक्कीच तिने कविता राऊतसमोर कडवे आव्हान उभे केले असते, असा विश्वास तिचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी व्यक्त केला.शालेय स्तरापासून ते जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत सुप्रियाने अनवाणी पायाने धावताना आपली छाप पाडली. दखल घेण्याची बाब म्हणजे गावात सरावायोग्य मैदान नसताना शेतातील गवत काढून त्याला अॅथलेटिक्स ट्रॅकचे रूप देत सुप्रिया व तिचे सहकारी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सराव करतात. सुप्रियाला आगामी राष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. नुकताच ४ जानेवारीला पार पडलेल्या अहमदाबाद अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत देखील सुप्रियाने अनवाणी पायाने धावताना १:२१:०० अशी शानदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच गतस्पर्धेत सुप्रियाने ४२ किमी अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेताना ९वे स्थान मिळवले होते. (क्रीडा प्रतिनिधी)
उरणच्या सुप्रिया पाटीलने लक्ष वेधले
By admin | Published: January 19, 2015 3:47 AM