दोहा : घानावर २-० विजय मिळवूनही बलाढ्य उरुग्वेचा फुटबॉल विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. घानाविरुद्ध उरुग्वेला कुठल्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. तसेच पोर्तुगालने द. कोरियाला पराभूत करणेही गरजेचे होते. तरच उरुग्वे बाद फेरी गाठू शकणार होता. घानाला पराभूत करत उरुग्वेने आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडले. पण द. कोरियाने बलाढ्य पोर्तुगालला २-१ ने दिलेल्या धक्क्याच्या वेदना उरुग्वेलाही जाणवल्या. कारण सरस गोल फरकामुळे द. कोरियाने बाद फेरीतील जागा निश्चित करत उरुग्वेचा स्वप्नभंग केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच उरुग्वेने आक्रमक चाली रचण्यावर भर दिला. त्याचाच परिणाम जॉर्जियन अर्रास्केटाने २६ व्या मिनिटाला गोल करत उरुग्वेला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच सहा मिनिटांनी त्यानेच संघासाठी दुसरा गोल केला. द. कोरियासोबतचा गोल फरक डोक्यात असल्याने उरुग्वेने मध्यंतरानंतरही गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना घानाला ४-० ने पराभूत करण्याची गरज होती. मात्र यात उरुग्वेला यश आले नाही.