अव्वल मानांकित नोवाक जोकोविच अत्यंत चिवट टेनिसपटू आहे. 'डिफेन्सिव्ह' खेळासाठी तो ओळखला जातो. म्हणजे, 'अटॅक' करून पॉईंट घेण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याला एरर करायला, चुका करायला भाग पाडण्याची त्याची रणनीती असते. पण, जेव्हा हे डावपेच काम करत नाहीत, तेव्हा जोकोविचचा वेगळा 'थयथयाट' कोर्टवर दिसू लागतो. त्याची चीडचीड, बडबड, आरडाओरड सुरू होते. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत, रशियाच्या डेनिल मेदवेदेवविरुद्धच्या सामन्यात सगळंच मनाविरुद्ध होऊ लागल्यानं जोकोविचचा हा अवतार पाहायला मिळाला.
यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा अव्वल मानांकित नोवाक जोकोविचसाठी अत्यंत महत्त्वाची, प्रतिष्ठेची होती. कारण, ही ट्रॉफी जिंकून त्याला 'कॅलेंडर ग्रँडस्लॅम'चा विक्रम करण्याची संधी होती. एकाच वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम पुरुष एकेरीत केवळ रॉड लेव्हर या दिग्गज टेनिसपटूलाच जमलाय. यूएस ओपनचं जेतेपद पटकावल्यास नोवाकचं नाव त्यांच्यासोबत जोडलं जाणार होतं. तसंच, पुरुष एकेरीत २१ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो पहिला टेनिसपटू ठरणार होता. पण, मेदवेदेव विरुद्धच्या सामन्यात हे स्वप्न धुसर होताना पाहून जोकोविचचा राग अनावर झाला. आधीच ऑलिम्पिक मेडल हुकल्याचं दुःख आणि आता इथेही प्रतिस्पर्धी डोईजड होऊ लागल्यानं 'जोकर' भलताच चिडला.
पहिला सेट जोकोविचनं ४-६ असा गमावला होता. त्यानंतर, दुसऱ्या सेटमध्येही 'कमबॅक' करण्याची संधी सापडत नव्हती. २-२ अशी बरोबरी झाली असताना, एक पॉईंट गमावल्यानं जोकोविचची सटकली. स्वतःवरच जोरात ओरडत त्याने आपली रॅकेट तीन वेळा कोर्टवर आपटून तोडली. हा प्रकार पाहून चेअर अंपायरनं त्याला वॉर्निंग दिली. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा मेदवेदेवनं जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करून ३-२ अशी आघाडी घेतली आणि ती निर्णायक ठरली. दुसरा सेटही ६-४ ने जिंकून मेदवेदेवनं जोकोविचवरचा दबाव वाढवला आणि मग सामन्यात पुनरागमन करणं जोकोविचला जमलं नाही. नोवाकसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला नमवून डेनिल मेदवेदेवनं कारकिर्दीतील पहिल्या ग्रॅडस्लॅम ट्रॉफीवर नाव कोरलं.