पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण क्षण अनुभवल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचला आता ग्रँडस्लॅम स्पर्धेत नवा विक्रम खुणावतो आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अमेरिकन ओपन स्पर्धेत तो आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक आहे. नव्या जोमानं खेळत उतार वयात आणखी एक नवं शिखर गाठण्याच्या इराद्यानेच तो कोर्टवर उतरणार आहे.
५ व्या जेतेपदासह २५ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घालण्याची संधी
यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत पाचव्यांदा जेतेपद पटकावल्यास जोकोव्हिच जिमी कॉनर्स, पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडरर यांची बरोबरी करत या स्पर्धेतील वयोवृद्ध चॅम्पियन होण्याचा विक्रम नोंदवण्याची त्याच्याकडे संधी आहे. एवढेच नाही या जेतेपदासह 25 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावे होईल. सध्याच्या घडीला महिला आणि पुरुष गटात एकत्रितपणे मार्गारेट कोर्टसह २४ ग्रँडस्लॅमसह तो संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे.
युवा पोरांनी दिलेल्या कडव्या आव्हानाचा करावा लागला सामना
हे वर्ष जोकोव्हिचसाठी आव्हानात्मक राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या २३ वर्षांच्या युवा इटालियन जॅनिक सिन्नर याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा गाजवत जोकोव्हिचचा नंबर वनचा ताज हिरावून घेतला. त्यानंतर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन स्पर्धेत कार्लोस अल्काराझनं आपली जादू दाखवली.
जगातील मानाच्या स्पर्धेतून कमबॅक
पण हे सगळं घडल्यावर हार मानेल तो जोकोव्हिच कसला. जोकोव्हिचनं ऑलिम्पिक स्पर्धेत अल्काराझला धक्का देत जबरदस्त कमबॅक करून दाखवलं. करिअर गोल्डन स्लॅमचं रिंगण पूर्ण केल्यावर आता पुन्हा तो नव्या टार्गेटसह नवं ध्येय सेट करून कोर्टवर उतरण्यास सज्ज आहे. एका बाजूला सिन्नरसारखा युवा टेनिस स्टारला डोपिंगसंदर्भातील गोष्टीमुळे चर्चेच्या गर्तेत आहे. दुसरीकडे ३७ व्या वर्षीही जोकोव्हिच नवा रेकॉर्डच्या दिशेनं पाऊल टाकताना दिसतोय. ही गोष्ट या टेनिस स्टारला सर्वांपेक्षा वेगळं ठरवते. पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पाडते. ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीनंतर वर्षाचा शेवट तो नव्या विक्रमासह करेल, हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.