नोव्हाक जोकोव्हिच याने वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अपेक्षेप्रमाण सहज विजय नोंदवला. आतापर्यंत ४ वेळा अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा जोकोव्हिच २५ व्या ग्रँडस्लॅमवर नजर ठेवून कोर्टवर उतरला आहे. पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासह टेनिस जगतात नवा विक्रम प्रस्थिपित करण्याच्या इराद्याने तो कोर्टवर उतरला आहे. याची सुरुवात त्याने खास विक्रमासह केली आहे.
जे कुणाला जमलं नाही ते जोकोव्हिचनं केलं साध्य; सलामीच्या विजयासह सेट केला नवा विक्रम
चार वेळच्या अमेरिकन ओपन चॅम्पियननं पहिल्या फेरीत मोल्डोवनच्या राडू अल्बोट याला ६-२, ६-२,६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयासह आर्थर ॲशे स्टेडियमवर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम जोकोव्हिचच्या नावे जमा झाला आहे. त्याचा या स्टेडियमवरील हा ७८ वा विजय ठरला. टेनिस जगतातील पुरुष गटात अन्य कोणालाही अशी कामगिरी जमलेली नाही. सलामी सामन्यात त्याने केलेली विक्रमी सुरुवात हा फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, अशीच भावना त्याच्या चाहत्यांच्या मनात असेल.
जोकोव्हिचच्या जबरदस्त तोरा, प्रतिस्पर्धी फार कमी वेळ टिकला
जोकोव्हिचनं पहिल्या सेटमध्ये ३-२ अशी आघाडी घेण्यासाठी एल्बोटची सर्विस ब्रेक केली. एल्बोटनं काही काळ बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा डाव फार काळ टिकला नाही. जोकोव्हिचनं सर्वोच्च दर्जाचा खेळ दाखवत फार कमी वेळात प्रतिस्पर्धी एल्बोटला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.
पॅरिस ऑलिम्पिकमधील गोल्डन कामगिरीसह सुपर कमबॅक
यंदाच्या वर्षात जोकोव्हिचला नावाला साजेसा खेळ करता आलेला नव्हता. पहिल्या तीन ग्रँडस्लॅममध्ये अपयशी ठरलेल्या जोकोव्हिचनं जगातील मानाची स्पर्धा समजलेल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमधून दमदार कमबॅक करून दाखवलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले होते. ज्या भिडूंनी वर्षभर दमवलं त्यांना शह देते त्याने मानाची स्पर्धा गाजवली. आता त्याच जोमानं वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून तो वर्षाचा शेवट गोड करेल, अशी अपेक्षा आहे.