विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न उरी बाळगून अमेरिकन ओपन स्पर्धेत उतरलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला तिसऱ्या फेरीत मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षीय अॅलेक्शी पोपिरिन याने अनुभवी आणि नावाजलेल्या खेळाडूला पराभूत केले.
ऑस्ट्रेलियन खेळाडूनं पहिल्या दोन सेटमध्ये ६-४, ६-४ अशी कामगिरी नोंदवत जोकोव्हिचला बॅकफूटवर ढकलल्याचे पाहायला मिळाले. तो सामन्यावर मजबूत पकड मिळवत असताना जोकोव्हिचनं ६-२ अशा फरकाने तिसरा सेट जिंकला. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूनं पुन्हा ६-४ या असा सेट जिंकत जोकोव्हिचला पॅकअप करायला भाग पाडले.
फेडरर, नदाल अन् नोव्हाक जोकोव्हिचची विजयी परंपरा खंडीत
टेनिसच्या कोर्टवरील आतापर्यंतची ही माझी सर्वात वाईट कामगिरी आहे, असे या पराभवाचं वर्णन खुद्द नोव्हाक जोकोव्हिच याने केले आहे. त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे २००२ पासून सातत्याने चालत आलेल्या जेतेपदाच्या परंपरेला ब्रेक लागला आहे. ही ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरु झाली की, फायनल बाजी मारणाऱ्या चेहऱ्यांमध्ये फक्त तिघांपैकी जोकोव्हिच, नदाल आणि फेडरर या तिघांपैकी एक नाव निश्चित असायचे. पण आता पहिल्यांदाच अमेरिकन ओपन स्पर्धेचा विजेता हा नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या तिघांपेक्षा वेगळा पाहायला मिळणार आहे. गत हंगामात नोव्हाक जोकोव्हिच यानेच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दिग्गजांपैकी एकही जेतेपद मिरवणार नाही, ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागणारी आहे.
पॅरिस ऑलिम्पिक गाजवल्यामुळं तो प्रबळ दावेदार होता, पण
नोव्हाक जोकोव्हिच याची यंदाच्या वर्षाची सुरुवातच खराब झाली होती. वर्षातील पहिल्या तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याला छाप सोडता आली नव्हती. पण पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसह त्याने वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅमसह नव्या विक्रमाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. तो गतवर्षीप्रमाणे यंदाही कोर्टवर आपली छाप सोडून विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घालेले, असेच वाटत होते. पण जे घडलं ते खूपच वेगळं आणि धक्कादायक असं आहे.
गेल्या कित्येक वर्षांत एवढ्या लवकर तो कधीच स्पर्धेबाहेर नाही पडला
एवढेच नाही तर २०१७ नंतर नोव्हाक जोकोव्हिचवर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपदाशिवाय कोर्टवरून परतण्याची वेळ आली आहे. याआधी मागील १६ वर्षांत जोकोव्हिच चौथ्या फेरीआधी कधीच अमेरिकन ओपन स्पर्धेतून बाहेर पडला नव्हता. पण यावेळी तिसऱ्या फेरीतच त्याला पॅकअप करावे लागले. २००५ आणि २००६ च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत तो लवकर स्पर्धेबाहेर पडला होता. पण त्यानंतर त्याने एवढ्या लवकर कधीच हार मानली नव्हती.