न्यूयॉर्क : येथे सुरू असलेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेला यंदा पुरुष गटात नवा चॅम्पियन मिळणार आहे. नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि स्पेनचा कार्लोस अल्काराज हे अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. तिसऱ्या मानांकित अल्काराजने उपांत्य फेरीच्या पाच सेटमधील लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा ६-७, ६-३, ६-१, ६-७, ६-३ ने पराभव करीत प्रथमच ग्रॅन्डस्लॅमची अंतिम फेरी गाठली. या विजयानंतर १९ व्या वर्षी अल्काराज जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याच्या स्थितीत आला. यासाठी त्याला रुडचे कडवे आव्हान मोडीत काढावेच लागेल.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या रुडने उपांत्य सामन्यात रशियाच्या करेन खचानोवचा ७-६, ६-२, ५-७, ६-२ ने पराभव केला. नार्वेच्या या २३ वर्षांच्या खेळाडूने यंदा दुसऱ्यांदा ग्रॅन्डस्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे. जूनमध्ये तो फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत राफेल नदालकडून पराभूत झाला होता.
सॅलिसबरी- राजीव राम पुरुष दुहेरीत विजेतेब्रिटनचा जो सॅलिसबरी आणि अमेरिकेचा राजीव राम यांनी सरळ सेटमध्ये वेस्ले कूलहोफ- नील स्कूप्स्की यांच्यावर ७-६,७-५ ने विजय नोंदवून यूएस ओपन टेनिसच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकाविले.