नवी दिल्ली : धावपटू पी. टी. उषा हिने अथक परिश्रमाने केरळच्या कोझीकोडे येथे ‘उषा स्कूल आॅफ अॅथ्लीट’ची स्थापना केली आहे. या स्कूलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते १५ जून रोजी होईल.उषाने मंगळवारी उद्घाटनासाठी गोयल आमंत्रण यांना दिले.कोझीकोडे जिल्ह्यातील किनालूर येथे ३० एकर परिसरात अकादमी आकारास आली आहे. जमीन केरळ सरकारने दिली असून, या स्कूलमध्ये आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. यासाठी केंद्र शासनाने तीन वर्षांआधी साडेआठ कोटी रुपये दिले होते. याशिवाय एक मड ट्रॅकदेखील तयार करण्यात आला असून, ४० खाटांचे वसतिगृहदेखील आहे.स्वत:ची अकादमी आदर्श आणि सुसज्ज बनविण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही असे सांगून उषा म्हणाली, ‘जिमसाठी सर्वच उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. जिममध्ये सहायक कोच, फिजियो, डॉक्टर आणि मसाज मॅन यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पॅव्हेलियन आणि फ्लड लाईटचीदेखील सोय करण्याचा निर्धार आहे. होस्टेलच्या विस्ताराची योजना असल्याचे उषाने सांगितले. (वृत्तसंस्था)
‘उषा स्कूल आॅफ अॅथ्लिट’ १५ जूनपासून सुरू होणार
By admin | Published: May 17, 2017 4:08 AM