मुंबईः आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत उत्कर्ष क्रीडा मंडळाने पुरुष गटाचे, तर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने महिला गटाचे विजेतेपद पटकावले. उत्कर्षने अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत साहसीवर २६-२० असा विजय मिळवला. महिला गटातील एकतर्फी ठरलेल्या अंतिम लढतीत महात्मा गांधीने ओम नवमहाराष्ट्र मंडळावर ४३-१५ असा दिमाखदार विजय मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून उत्कर्षाच्या नितीन घोगळे याला सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट चढाईसाठी आतिश शिंदे (साहसी) आणि उत्कृष्ट पकडीसाठी क्षितीज पाटील (उत्कर्ष) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून चेंबूर क्रीडा केंद्र (चेंबूर) यांची निवड करण्यात आली.
पुरुषांच्या अंतिम सामन्याची सुरुवात सनसनाटी ठरली. साहसी संघाने उत्कर्षवर झटपट लोन देत १२-२ अशी मोठी आघाडी मिळविली आणि मध्यंतराला १४-७ अशी स्थिती होती. उत्तरार्धात मात्र उत्कर्ष संघाने कात टाकली. त्यांच्या नितीन घोगळे आणि पुरुषोत्तम प्रभू या खेळाडूंनी सातत्यपूर्ण चढाया करीत आपला दबदबा निर्माण केला. प्रतिस्पर्ध्याकडे १८-१६ अशी आघाडी असताना नितीन घोगळे याने एकाच चढाईत तीन खेळाडूना बाद करताना संघाला प्रथमच १९-१८ असे आघाडीवर नेले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. खेळावर पूर्णपणे वर्चस्व राखताना त्यांनी अखेर ही लढत २६-२० अशी जिंकून विजेतेपद खिशात टाकले. नितीन आणि पुरुषोत्तम प्रभू या दोघांना क्षितीज पाटीलच्या पकडीची उत्तम साथ लाभली. साहसीच्या आतिश शिंदे आणि शुभम शिंदे यांनी चांगला खेळा केला.
महिला गटातील अंतिम लढतीत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या सृष्टी चाळकेने एकाच चढाईत तीन खेळाडू टिपले आणि त्यानंतरही सातत्यपूर्ण गुण वसूल करत पहिल्या सत्रातच नवमहाराष्ट्र मंडळावर दोन लोन चढवत २३-७ अशी मोठी आघाडी घेतली. तिला साक्षी गावडे हिने जबरदस्त पकडी करीत उत्तम साथ दिली. उपांत्य फेरीत आपल्या जबरदस्त खेळाने संघाला अंतिम फेरीत नेणारी करिष्मा म्हात्रे आणि त्यांची स्टार खेळाडू रेजिना रड्या यांचा प्रतिकार आज कमी पडला. त्यातच रेजीनाच्या मानेला दुखापत झाली आणि अखेर त्यांनी ही लढत ४३-१५ अशी गमावली. महात्मा गांधीच्या सृष्टी चाळकेची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करणात आली, तर उत्कृष्ट चढाई साठी ओम नवमहाराष्ट्र संघाची करिष्मा म्हात्रे आणि उत्कृष्ट पकडीसाठी साक्षी गावडे (महात्मा गांधी) यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून गोरखनाथ संघ (कुर्ला) यांची निवड करण्यात आली.