टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला.. साखळी फेरीत सलग पराभव पत्करावा लागल्यानंतर महिला संघाचे आव्हान इथेच संपेल असे वाटत असताना मुलींनी कमाल करून दाखवली. या संघानं थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून ऐतिहासिक कामगिरी केली. कांस्यपदकाच्या सामन्यातही चिवट झुंज देऊन त्यांना हार मानावी लागली, परंतु चौथ्या स्थानापर्यंत त्यांनी मारलेली मजल ही इतिहास घडवून गेली. याच स्पर्धेत उत्तराखंडची खेळाडू वंदना कटारीया ( Olympian Vandana Katariya) हिनं रिकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
टोकियो गाजूवन मायदेशात परतलेली वंदना उत्तराखंड येथे पोहोचताच गहिवरली.. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. जेव्हा जेव्हा ती कोणत्याही स्पर्धेतून घरी यायची तेव्हा विमानतळाबाहेर वडील तिची वाट पाहत उभे असायचे, परंतु आज ते या जगात नाहीत आणि त्यांच्या आठवणीमुळे तिला अश्रू अनावर झाले. घरी पोहचल्यावर आई समोर दिसताच स्वतःला कशी सांभाळेन हा प्रश्न तिला सतावत होता. घरी पोहोचताच ती आईला बिलगली अन् दोघीही ढसाढसा रडू लागल्या. वंदनाच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्यावेळी ती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी बँगळुरू येथे होती. वंदना तिच्या वडिलांच्या खूप क्लोज होती. वडिलांनी नेहमी तिला पाठिंबा दिला अन् स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली.
त्यामुळे जेव्हा वंदना जौलीग्रांट विमानतळावर पोहोचली तेव्हा वडिलांची आठवण येत होती. वडिलांच्या निधनानंतर वंदना प्रथमच आपल्या घरी गेली. ती म्हणाली, वडिलांच्या निधनानंतर मी प्रथमच घरी जात आहे, त्यांच्याशिवाय घराचा विचारच करवत नाही. मी स्वतःला सांभाळूच शकत नाही. ते नेहमी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे. अपयशानंतरही त्यांनी मला कधीच खचू दिले नाही. माझ्यापेक्षा जास्त जोश मी त्यांच्यात पाहायचे. आता मला ती ताकद व जोश कोण देणार?
वंदनानं ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून द्यावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा वडिलांच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा वंदना द्विधा मनस्थितीत आली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं बँगळुरूत सराव शिबिरात राहण्याचा निर्णय घेतला अन् ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून इतिहास घडवला. सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करण्यात अपयश आल्याची खंत तिला वाटते.