नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक सध्या अनेक शहरांमधून फिरविला जात आहे. येथील फिरोजशाह कोटला मैदानावर गुरुवारी क्रिकेट चाहत्यांसाठी चषक ठेवण्यात आला. या वेळी युवराजसिंग आणि पवन नेगी हे आकर्षण होते. दोन्ही खेळाडू आले. त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला; पण मीडियाला मात्र निराशेच्या गर्तेत सोडून या स्टार खेळाडूंंनी काढता पाय घेतला.विश्वचषकासाठी संघात समावेश झालेला युवराज आणि आयपीएल लिलावात साडेआठ कोटी मिळालेला पवन नेगी येत असल्याचे समजताच कोटलावर मीडिया प्रतिनिधींची गर्दी जमली होती. विश्वचषकासंदर्भात दोन्ही खेळाडू काही भाष्य करतील, अशी सर्वांना आशा होती. दोन्ही खेळाडू क्रिकेटबाबत काही बोलले नाहीच; शिवाय मीडियाकडे पाठ फिरवित निघून गेले. आयोजकांनी मात्र बीसीसीआयच्या धोरणाचा उल्लेख करीत, खेळाडूंना मीडियाशी बोलण्यास बंदी असल्याने ते बोलू शकले नाहीत, अशी सबब दिली. आयसीसी पुरुष आणि महिला विश्वचषकानिमित्त विशेष डिझाईन केलेली डबल डेकर बस राजधानीत फिरविण्यात आली. या बसमध्ये स्थानिक एनजीओतील मुले बसली होती. बस कोटला मैदानात येताच युवराज आणि नेगी या मुलांमध्ये सहभागी झाले. या दोघांनी मुलांसोबत काहीवेळ क्रिकेटचा आनंद लुटला शिवाय मुलांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. मीडियाचे प्रतिनिधी काही अंतरावरून हे दृश्य पाहत होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटू काही बोलतील अशी आशा होती; पण दोन शब्द बोलण्याचे त्यांनी टाळले. कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण करीत दोघेही बाऊन्सर्सच्या सरंक्षणात बाहेर गेले. याच युवराजने कर्करोगाशी लढा दिल्यानंतर, अमेरिकेतून येताच कॉन्स्टिट्यूशन्स क्लबमध्ये मीडिया प्रतिनिधींना पाचारण केले होते. त्यांच्यासोबत मनसोक्तछायाचित्रे काढली होती. दीर्घकाळानंतर संघात स्थान मिळताच मीडिया कर्मचाऱ्यांसोबत बोलण्याचीदेखील त्याला गरज भासली नाही.
युवी आला, पण निराश करून गेला!
By admin | Published: February 19, 2016 2:53 AM