नवी दिल्ली : दीर्घकाळानंतर पुनरागमन झालेला अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आणि फिरकी गोलंदाज हरभजनसिंग, डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा यांना टी-२० विश्वषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वन डे आणि टी-२० मालिकेत खेळलेल्या भारतीय संघात किरकोळ बदल करण्यात आले असून विश्वचषक तसेच आशिया चषक स्पर्धेसाठी समान संघ निवडण्यात आला. शुक्रवारी जाहीर झालेल्या १५ जणांच्या संघात युवा अष्टपैलू पवन नेगी याने आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळविले आहे.राष्ट्रीय निवड समिती प्रमुख संदीप पाटील, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांच्यासह निवड समितीच्या अन्य सदस्यांनी दीड तास सल्लामसलत केल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला संघ जाहीर केला. महेंद्रसिंग धोनी याच्याकडे पुरुष तसेच मिताली राजकडे महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. विश्वचषकासाठी जो संघ निवडण्यात आला तोच संघ आशिया चषकातही खेळणार आहे. जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला देखील निवडकर्त्यांनी पसंती दिली. याशिवाय जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि पवन नेगी या नवोदित खेळाडूंना स्थान मिळाले तर अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव, ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर यांना डच्चू देण्यात आला.शमीच्या निवडीबद्दल पाटील म्हणाले,‘ विश्वचषक सुरू होण्यास ३० दिवसांचा वेळ आहे. आमच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. शमी बरा होईपर्यंत इतर खेळाडू त्याची उणीव भरून काढतील. एकदा फिट झाला की शमीला संधी दिली जाईल. मनीष पांडेला ‘ड्रॉप’ केले नाहीआॅस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या मनीष पांडे याला वगळण्यात आल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले,‘मनीषला ड्रॉप केले असे म्हणता येणार नाही. मनीषने आॅस्ट्रेलिया दौऱ्यात जी कामगिरी केली त्यावरून तो आमच्यासाठी भविष्यातील आशा आहे. बैठकीत सर्वांच्या नावावर व कामगिरीवर चर्चा झाली. कुणी जखमी झाला तर त्याची उणीव भरून काढणारे खेळाडू आम्हाला हवे होते. ’अमित मिश्राबाबत ते म्हणाले,‘खेळाडू निवडताना भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. परिस्थिती पाहून खेळाडू निवडले. अमित मिश्राच्या कुवतीचा आम्ही सन्मान करतो पण परिस्थितीनुरुप जे खेळाडू हवे होते तेच आम्ही निवडले आहेत.’ बुमराह आणि पंड्या यांना आॅस्ट्रेलिया दौरा तसेच स्थानिक क्रिकेटमधील देखण्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. अजिंक्य आॅस्ट्रेलियात जखमी झाला होता पण त्याला मनीष पांडेऐवजी प्राधान्य देण्यात आले. दिल्लीचा २३ वर्षांचा डावखुरा फिरकी गोलंदाज पवन नेगी हा तळाच्या स्थानावरील उपयुक्त फलंदाजही आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. आशिया चषकाचे आयोजन बांगला देशात १९ फेब्रुवारीपासून होत आहे. ६ मार्चपर्यंत स्पर्धा चालेल. टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारतात ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होईल. पुरुष संघासोबतच महिला विश्वचषकाचेही आयोजन होत असून त्यासाठी संघ निवडण्यात आला पण पत्रकारांनी सर्व प्रश्न पुरुष संघाबाबतच विचारले. (वृत्तसंस्था)
युवी, हरभजन, नेहराला संधी
By admin | Published: February 06, 2016 3:17 AM