जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे. शिवाय या स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या दीपक पुनियानं 65 किलो वजनी गटाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर बजरंग पुनियाला अव्वल स्थान गमवावे लागले. राहुलने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताने चार कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे.
2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.
57 किलो वजनी गटातील कांस्यपदक विजेत्या रवी दहीयानेही अव्वल पाचात स्थान पटकावले. महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.