बंगलोर : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय सीनियर पुरुष संघाच्या यशानंतर २३ नोव्हेंबरपासून चार देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेसाठी संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. संघाचे नेतृत्व ड्रॅग फ्लिकर व्ही. आर. रघुनाथ करेल.भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यात चार देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत खेळेल. त्यानंतर यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाईल. नियमित कर्णधार आणि गोलकिपर पी. आर. श्रीजेश हा गुडघ्याच्या जखमेमुळे संघाबाहेर असल्याने रघुनाथकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. श्रीजेशला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कोरियाविरुद्ध उपांत्य सामन्यादरम्यान जखम झाली होती. संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी बचाव फळीतील खेळाडू आणि ड्रॅग फ्लिकर रूपिंदरपालसिंग याच्याकडे असेल. रूपिंदरने आशियाई ट्रॉफीत सर्वाधिक गोल केले होते. याच स्पर्धेत यशस्वी गोलकिपिंग करणारा यवतमाळचा आकाश चिकटे हा गोलकिपर असून दुसरा गोलकिपर म्हणून उत्तर प्रदेशचा अभिनव पांडे याला स्थान देण्यात आले. चार देशांच्या स्पर्धेत अन्य संघ न्यूझीलंड आणि मलेशिया हे राहतील. संघाचे मुख्य कोच रोलॅन्ट ओल्टमन्स म्हणाले, ‘अभिनव हा आधी संघात होता, पण गुडघ्याच्या जखमेमुळे संघाबाहेर झाला. आता पुन्हा परतल्याने आनंदी आहे. अनुभवी स्ट्रायकर एस. व्ही. सुनील जखमेतून अद्याप सावरलेला नाही. रिओ आॅलिम्पिकदरम्यान त्याच्या मनगटाला जखम झाली होती. तो आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. ज्युनियर विश्वचषकासाठी सीनियर्स आणि ज्युनियर्स यांचा ताळमेळ साधून संघ पाठवित आहोत. यातून चांगले रिझल्ट मिळतील.’ (वृत्तसंस्था) भारतीय हॉकी संघ :गोलकिपर आकाश चिकटे,अभिनव कुमार पांडे.बचाव फळी : रूपिंदरपालसिंग (उपकर्णधार), प्रदीप मोर, व्ही.आर. रघुनाथ (कर्णधार), वीरेंद्र लाक्रा, कोथाजितसिंग आणि सुरेंद्र कुमार. मधली फळी: चिंगलेनसानासिंग, मनप्रीतसिंग, सरदारसिंग, एस. के. उथप्पा. आक्रमक फळी: तलविंदरसिंग, निकिन तिमय्या, अफान यूसुफ, मोहम्मद आमिर खान, सतबीरसिंग आणि आकाशदीपसिंग.
व्ही. आर. रघुनाथकडे भारतीय संघाचे नेतृत्व
By admin | Published: November 12, 2016 1:31 AM