ऑनलाइन लोकमत
बागपत (उत्तरप्रदेश), दि. २५ - वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणा-या सेमीफायनलसाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असून या मॅचसाठी सुरेश रैनाच्या भावी पत्नीच्या गावी अघोषीत सुट्टी देण्यात आली आहे. गावातील शेतमजूर व कामगारांनी सुट्टी घेतली असून सामन्यासाठी गावात भव्य स्क्रिनही लावण्यात आली आहे.
वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सात विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. उद्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताला विजय मिळावा यासाठी देशभरात होमहवन सुरु आहे. सुरेश रैनाची भावी पत्नी प्रियंका चौधरीचे गावही यातून दूर नाही. सुरेश रैना गावाचा जावई होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा उत्साह आहे. उद्या गावातील शेतमजूर व शेतमालक शेतात जाणार नाही, तर कामगारही सुट्टीवर जाणार आहेत. गावातील नोकरदार वर्ग उद्या सुट्टी घेणार आहे. गावातील उत्साहपूर्ण वातावरणाविषयी गावाचे सरपंच कालू सिंह सांगतात, उद्या गावात पंचायतीमार्फत भव्य स्क्रिन लावण्यात येणार आहे. गावातील सर्व मंडळी या स्क्रिनवरच सामन्याचा आनंद लुटतील. भारतीय संघ आणि विशेषतः सुरेश रैनाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी गावातील हनुमान मंदिरात पुजा केल्याचे कालू सिंह यांनी सांगितले.