ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.३ : नागपूरच्या वैष्णवी भालेने पुण्याच्या श्रृती मुंदडाचा २-० असा धुव्वा उडवत पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटात अजिंक्यपद मिळवले. तर दुहेरी गटात देखील वैष्णवीने श्रृतीच्या साथीने पुण्याच्या मानसी गाडगीळ-वैष्णवी अय्यर जोडीचा २-० असा पराभव करत स्पर्धेत डबल धमाका केला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोटर््स युनायटेडच्या वतीने निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन चेंबूरमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत वैष्णवीने पहिल्या सेटपासून जबरदस्त खेळाने सुरुवात केली. बचावात्मक नेट शॉट्स आणि स्मॅश यांचे योग्य संतुलन राखत वैष्णवीने पहिल्या सेटमध्ये २१-१५ अशी आघाडी घेतली. १-० अशा पिछाडीवर असणाऱ्या श्रृतीने दुसऱ्या सेटमध्ये काहीअंशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मॅश क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या वैष्णवीने लौकिकास साजेसा खेळ करत श्रृतीचे आव्हान २१-१८ असे परतवून लावत एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.दुहेरीत वैष्णवी-श्रृती जोडीने मानसी-वैष्णवी अय्यर जोडीविरुद्ध २१-१८, २१-१९ अशा गुणसंख्येची नोंद करत विजेतेपद मिळवले. एकेरी गटात वैष्णवी-श्रृती एकमेंकांविरुद्ध खेळत होते, परिणामी एकमेकांची बलस्थाने त्यांना समजली होती. त्याचा फायदा त्यांना दुहेरीत एकत्र खेळताना झाला. दुहेरीत मानसी-वैष्णवी जोडीने दोन्ही सेटमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली मात्र मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांचा फटका मानसी-वैष्णवी जोडीला बसला आणि त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.पुरुष एकेरी अजिंक्यपदाच्या सामन्यात अव्वल मानांकित बृहन्मुंबईच्या निगेल डिसिल्व्हाने बाजी मारली. निगेलने अंतिम फेरीत पुण्याच्या अमेय ओकवर २१-०६, २१-११ असा सहज विजय मिळवला. अंतिम सामन्यात सुरुवातीपासून अमेयचा खेळ काहीसा निराशाजनक झाला. त्याच्या फायदा उचलत अनुभवी निगेलने आक्रमक स्मॅशच्या जोरावर गुणांची कमाई करत एकेरी अजिंक्यपदावर कब्जा केला. पुरुष दुहेरीत अभिषेक कुलकर्णीने (ठाणे)-निशांद द्रविडच्या (पुणे) साथीने ठाण्याच्या अक्षय राऊत-प्रसाद शेट्टी जोडीचा २१-१६, १४-२१, २१-१९ असा नमवले. तर मिश्र दुहेरीत समीर भागवत-गौरी घाटे जोडीने निशाद द्रविड-मानसी गाडगीळ जोडीला २१-२३, २१-१७, २१-१२ अशी धुळ चारली.
महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेत वैष्णवी भालेचा डबल धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2016 7:18 PM