नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर संपणार असून बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाच्या निवड प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची आयपीएलच्या दहाव्या पर्वादरम्यान वीरेंद्र सेहवागसोबत भेट झाली. त्यांनी माजी आक्रमक फलंदाज सेहवागला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते, पण सेहवागच्या मते त्याला अद्याप कुणीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितलेले नाही. अधिकाऱ्याच्या मते प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत केवळ एकटा सेहवाग नसून अन्य माजी क्रिकेटपटूही या पदासाठी अर्ज करतील. दरम्यान, अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत टीम इंडियाने सलग पाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाने कसोटी मानांकनामध्ये अव्वल स्थानही पटकावले आहे, पण बीसीसीआयचे काही अधिकारी सदस्य व सपोर्ट स्टाफचे मानधन वाढविण्याच्या कुंबळे यांच्या मागणीवर नाराज आहेत. (वृत्तसंस्था)
वीरूला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले
By admin | Published: May 29, 2017 12:38 AM