लुसाने : जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट याच्यावर नऊपैकी एक आॅलिम्पिक सुवर्ण गमविण्याची वेळ आली आहे. संघातील त्याचा सहकारी नेस्टा कार्टर हा बुधवारी अमली द्रव्य सेवनात दोषी आढळल्याने बोल्टवर ही कारवाई केली जाईल. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये ४ बाय १०० मीटरचे सुवर्ण विजेत्या जमैकाच्या रिले संघात कार्टर हा बोल्टचा सहकारी होता, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. बोल्टने २००८, २०१२ आणि २०१६ च्या आॅलिम्पिकमध्ये १००, २०० आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. आयओसीने
गतवर्षी ज्या ४५४ नमुन्यांची फेरचाचणी घेतली त्यात कार्टरचा नमुनादेखील होता. मेथीलहेक्सानेमाईन हे द्रव्य कार्टरच्या नमुन्यात आढळले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेत्या जमैकाच्या रिले संघात देखील ३१ वर्षांच्या कार्टरचा समावेश होता. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेत्या जमैका संघाला आता अपात्र घोषित करण्यात येणार असून
त्यांचे सुवर्ण काढून घेण्यात येईल, तसेच विक्रम पुसून टाकण्यात येणार आहे.
याआधी तिहेरी उडीतील रौप्य पदक विजेती रशियाची ४० वर्षांची तात्याना लेबेदेव्हा हिलादेखील २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले होते. तिचा चाचणी नमुनादेखील दोषी आढळला होता. (वृत्तसंस्था)