किंग्सटन : पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान मनुष्य असा लौकिक मिळवलेला जमैकाचा ‘स्प्रिंट किंग’ उसेन बोल्ट याने आगामी रिओ आॅलिम्पिक आपली शेवटची आॅलिम्पिक असल्याचे सांगत आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. विशेष म्हणजे बोल्ट २०२० मध्ये जपानला (टोकियो) होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेबाबत घोषणा करून बोल्टने सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर लंडन - २०१७ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचेही बोल्टने स्पष्ट केले.आधुनिक अॅथलेटिक्सचा चेहरा असलेल्या उसेन बोल्टने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालताना स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. दखल घेण्याची बाब म्हणजे प्रशिक्षक ग्लेन मिल्स यांच्या सल्ल्यानुसार तंदुरुस्ती राखल्यास मी टोकियो आॅलिम्पिकपर्यंत खेळू शकतो, असे वक्तव्य करून बोल्टने आपल्या दिमाखदार कारकिर्दीबाबत उत्सुकता वाढवली होती. मात्र, बोल्टने वृत्तसंस्थेला आपल्या निवृत्तीबाबत माहिती देताना सांगितले, की यंदाची आॅलिम्पिक माझी शेवटची स्पर्धा असून, या स्पर्धेत आणखी तीन सुवर्ण जिंकण्याचा निर्धार आहे.याविषयी बोल्ट म्हणाला, ‘‘निश्चितपणे रिओ आॅलिम्पिक माझी शेवटची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. माझ्यासाठी आणखी चार वर्षे खूप कठीण आहे. मला जे साध्य करायचे आहे, ते मी रिओमध्ये साध्य केल्यास ती प्रेरणा आणखी चार वर्षे टिकवून ठेवणे माझ्यासाठी कठीण आहे. त्यामुळेच आणखी चार वर्षे हेच सातत्य कायम राखणे कठीण असल्याची जाणीव असल्याने ही स्पर्धा माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक असेल.’’ बोल्टने २००८ व २०१२ साली आॅलिम्पिकमध्ये एकूण ६ सुवर्ण पदकांची लयलूट केली. २०१७ मध्ये लंडनमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीची ‘अंतिम रेषा’ पार करण्याची बोल्टची योजना आहे.
वेगाचा विश्वविक्रमी बादशाह निवृत्त होतोय
By admin | Published: March 23, 2016 3:15 AM