मेरठ
प्रतिभा कधीच गरिबीची शिकार ठरू शकत नाही. मेरठच्या नीरज चौहानने हे सिद्ध करुन दाखवले आहे. मेसमध्ये जेवण बनवणारा आणि भाजी विकणारा अच्छेलाल चौहान यांचा मुलगा नीरजने तिरंदाजी विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे. मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियमच्या मेसमध्ये जेवण बनवणाऱ्या अच्छेलाल चौहान यांचा तिरंदाज मुलगा नीरज चौहान याने आशियाई क्रीडा स्पर्धेत (तिरंदाजी विश्वचषक संघ) आपले स्थान निश्चित केले आहे. हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या तिरंदाजी चाचणीत नीरजने दुसरा क्रमांक मिळवून ही कामगिरी केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
नीरज चौहान याने कोरोनाच्या काळात वडील आणि भावांसोबत हातगाडीवर भाजीही विकली आहे. मूळचे गोरखपूरचे रहिवासी असलेले अच्छेलाल यांना तीन मुलगे आहेत, सुनील चौहान 24 वर्ष (बॉक्सर), सुमित चौहान 21 वर्ष (बॉक्सर) आणि नीरज चौहान 19 वर्ष जो तिरंदाज आहे. त्यांची तीनही मुले क्रीडा क्षेत्रात खूप पुढे आहेत.
अचेलाल चौहान 1992 पासून मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममधील मेसमध्ये जेवण बनवायचे, परंतु त्यांची नोकरी कायमस्वरूपी नव्हती. कोरोनाच्या काळात जेव्हा मेस बंद झाला आणि त्याची नोकरी गेली तेव्हा घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. घर चालवण्यासाठी अच्छेलाल यांना भाजीचा ठेला सुरू करावा लागला. त्यांचे तीन मुलगेही हातगाडीवर भाजीपाला विकून वडिलांना मदत करू लागले. नीरज आणि त्याचा बॉक्सर भाऊ सुनील आणि सुमित यांनी वडिलांसोबत हातगाडीवर भाजी विकायला सुरुवात केली.
किरन रिजीजूंपर्यंत पोहोचला व्हिडिओबाप आणि मुलांचा भाजी विकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची दखल घेतली. मंत्रालयाने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली होती. त्याच वर्षी नीरज चौहानची हरियाणातील ITBP मध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आणि हरियाणाच्या सोनीपत येथे झालेल्या तिरंदाजी चाचणीत नीरजने असा पराक्रम केला की तो आता आशियाई खेळ (तिरंदाजी विश्वचषक) संघाचा भाग बनला. सध्या नीरज दिल्लीच्या खेलो इंडिया हॉस्टेलमध्ये राहून तिरंदाजीचा सराव करत आहे.
नीरजच्या निवडीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, मुलाने आमचे नाव काढल्याचे वडील अच्छेलाल चौहान यांनी सांगितले. आता नीरजने कुटुंबाला मोठा आनंद देऊन जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. दुसरीकडे, नीरजच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना स्टेडियममधून घर रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे, कारण अच्छेलाल यांची नोकरी कायम नव्हती, आता त्यांना घर रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. नीरज चौहानचे वडील अच्छेलाल सांगतात की, त्यांचे पाणी आणि वीज कनेक्शन कापले गेले आहे, त्यांनी मागणी केली आहे की त्यांना आणखी काही वेळ द्यावा जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करू शकतील.