ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला. भारताकडून चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदिप यादवने सर्वाधिक 3, भुवनेश्वर कुमारने 2 आणि आर.अश्विनने एक गडी बाद केला. तर वेस्ट इंडिजकडून होपने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली.
पावसामुळे उशीराने सुरु झालेला हा सामना प्रत्येकी 43 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोर्ट ऑफ स्पेन येथे यजमानांनी नाणेफेक जिंकत पाहुण्या टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर रहाणे - धवन यांनी चौफेर फटकाबाजीस सुरुवात केली. त्यांनी खराब चेंडूंना सीमापार धाडतानाच काही चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मानही दिला. कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता दोन्ही सलामीवीरांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली. सलग दुसऱ्या सामन्यात रहाणे - धवन यांनी शतकी भागीदारी करताना भारताला 114 धावांची सलामी दिली. अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर धवन यष्टीचीत झाला. त्याने 59 चेंडूत 10 चौकारांसह 63 धावा केल्या.
यानंतर रहाणे - कोहली यांनी सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना 97 धावांची भागीदारी करुन यजमानांना दमवले. रहाणे शतक झळकावल्यानंतर लगेच बाद झाला. त्याने 104 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारांसह 103 धावा केल्या. यावेळी, सर्वांच्या नजरा मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यावर होता. परंतु, तो केवळ 4 धावांवर परतल्यानंतर युवराज सिंगही झटपट बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला.
मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या कोहलीने मोक्याच्यावेळी गती वाढवताना भारताला तिनशेच्या पलीकडे नेण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने 66 चेंडूत 4 चौकार व 4 षटकार ठोकत 87 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये एमएस धोनी (13*) व केदार जाधव (13*) यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारताने मोठी धावसंख्या रचली.