अयाझ मेमन संपादकीय सल्लागारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धचा एकदिवसीय मालिका विजय शानदार होता, परंतु त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची आठवण कमी होणार नाही. मुळात, विंडीजचा संघ तुलनेत कमजोर होता आणि भारत - पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक वाद पाहता या दोन देशांतील सामन्याची तुलना इतर कोणत्याही सामन्याशी करता येणार नाही. दुर्दैवाने आपण चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पाकविरुध्द हरलो, पण त्याची भरपाई विंडीजविरुद्ध झाली असे कधीच म्हणता येणार नाही,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी व्यक्त केले. मंगळवारी दुपारी ३ वाजता लोकमत पेजवर मेमन यांचा खास लाईव्ह एफबी चॅट आयोजित करण्यात आले होते. या वेळी, मेमन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी, विंडीज दौरा आणि सध्या गाजत असलेला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड अशा विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. विंडीजविरुद्धच्या मालिकेबाबत मेमन यांनी सांगितले, ‘विंडीजचा संघ तुलनेत दुय्यम होता. एकदिवसीय मालिका आपण जिंकलो, पण एक वेळ मालिका बरोबरीत सुटण्याची शक्यता होती. यानंतर झालेल्या टी-२० सामन्यात आपण हरलो. सुनील नरेन, ख्रिस गेल, पोलार्ड हे सर्व विंडीज संघात परतले होते. विंडीज टी-२० चॅम्पियन आहे. त्याचवेळी, हा दौरा भारतासाठी प्रयोग करण्याची संधी होती. राखीव फळीला संधी देण्याची आवश्यकता होती. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांची क्षमता जाणून घेता आली असती. तसेच, मुख्य खेळाडूंवरही संघातील जागा गृहीत न धरण्याबाबत दबाव टाकता आला असता. कदाचित आगामी श्रीलंका दौऱ्याच्या दृष्टीने हे प्रयोग टाळले असतील. पण भारतीय संघ जेवढा उशीर करेल, तितकं त्यांना प्रयोग करण्याची वेळ कमी मिळेल.’विराटचा संघ स्टीव्ह वॉच्या संघाप्रमाणे मजबूत आहे का, या प्रश्नावर मेमन म्हणाले, ‘नक्कीच विराटच्या संघात खूप जोश आहे. स्टीव्ह वॉचा संघ वेगळाच होता. त्याच्या संघातील खेळाडू जबरदस्त होते. विराट संघावर विंडीज मालिका सुरू होण्याआधीच दबाव होता. संघाला विजयी लयीची गरज होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ती दिसली. पण आपण केवळ पाकविरुद्धच नाही तर लंकेविरुद्धही हरलो. विंडीज दौरा सुरू होण्याआधी प्रशिक्षकाने राजीनामा दिला. कर्णधार - प्रशिक्षक प्रकरणाचा संघावर काहीसा परिणाम झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे आपण जे सामने गमावले ते मोठ्या अंतराने गमावले. एकही सामना अटीतटीचा खेळ करून हरलो नाही. विराट संघात जोश नक्कीच आहे, पण कुठेतरी विस्कळीतपणा अजूनही आहे.’सर्वांचे लक्ष वेधलेल्या कोहली - कुंबळे प्रकरणाबाबत मेमन म्हणाले, ‘खरं म्हणजे या प्रकरणाची पूर्ण माहिती अजूनही कोणालाच नाही. माझ्या मते जनरेशन गॅप हे एक कारण आहे. जनरेशन गॅप कधी कधी फायदेशीर ठरतो. पण इथे कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात २० वर्षांचा फरक असल्याने खूप मोठा परिणाम झाला. दोघेही विरुद्ध दिशेने विचार करणारे होते.विशेष म्हणेज दोघेही जबरदस्त खेळाडू आहेत. दोघांमध्ये विजयाची भूक आहे. दोघेही भारतीय क्रिकेटच्या भल्याचा विचार करणारे आहेत. यानंतरही दोघांमध्ये मतभेद होत असतील, तर मला वाटते हा मानवी स्वभाव आहे.रोमान्स दहा - दहा वर्षांपर्यंत चालतो आणि लग्न सहा महिन्यांत मोडतं. असे का होते हे सांगणे कठीण आहे. पण एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप नाजूक असतं त्यात थोडासाही ताण आला, तर अडचण होते.शेवटी हा ‘रिलेशन मॅनेजमेंट’चा विषय आहे.’शेन वॉर्नने एकदा सांगितले होते, की मैदानातून हॉटेल आणि हॉटेलमधून मैदानावर जाण्यासाठीच प्रशिक्षक लागतो. क्रिकेटमध्ये खरं म्हणजे प्रशिक्षक नसतो. तो मेंटॉर असू शकतो, सल्लागार असू शकतो. कारण सचिनचे कोच होते ते रमाकांत आचरेकर. जॉन राइट, डंकन फ्लेचर नाही. तसेच, विराटचे प्रशिक्षक दिल्लीचे राजकुमार शर्मा आहेत. त्यामुळे अनिल कुंबळेसारखा दिग्गज खेळाडू विराटला फलंदाजी थोडी ना शिकवेल. तो केवळ सल्ला देऊ शकेल. मला वाटते, दोघांचा दृष्टिकोन वेगळा होता. अनेक जण म्हणतात, याआधीचे प्रशिक्षक यशस्वी होते कारण ते कर्णधाराशी चांगले होते. माझ्या मते, क्रिकेटमध्ये कॅप्टन हा कॅप्टन असतो. फुटबॉलमध्ये मॅनेजर कर्णधाराला बाहेर काढू शकतो एवढी त्याची शक्ती असते. पण क्रिकेटमध्ये कॅप्टनच निर्णय घेतो. - अयाझ मेमनभारत - पाक सामना फिक्स?या चॅटदरम्यान एका क्रिकेटचाहत्याने प्रश्न केला, की चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना फिक्स होता का? यावर मेमन म्हणाले, ‘मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक सामन्यात होतो. पण असे काही वाटत नाही. विजय कधीच फिक्स करता येत नाही. जर समोरचा संघही फिक्स करण्यास तयार असेल, तरच हे शक्य होते आणि हे खूप अशक्य आहे, की भारतीय संघच ठरवेल, की आम्ही सामना हरणार. मुळात हा सामना फिक्स असल्याचा प्रश्नच येत नाही. आज खेळाडूंनी जी काही प्रतिष्ठा, ऐश्वर्य मिळवले ते विजयाच्या जोरावर. त्यामुळे पराभव फिक्स करून ते याबाबत धोका कधीच पत्करणार नाहीत. भ्रष्टाचार प्रत्येक खेळामध्ये आहे. हे पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून असते. कितीही बंदोबस्त केला भ्रष्टाचार रोखण्याचे पण एखाद्याने ठरवलं, की मी कसंही करून २० च्या आत बाद होणार, तर तो बाद होणारच, त्यामुळे वैयक्तिक मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे.’
विंडीजविरुद्धच्या विजयाची तुलना पाकविरुद्ध होऊ शकत नाही
By admin | Published: July 12, 2017 12:43 AM