पॅरालिम्पिक २०२१ स्पर्धेत शुक्रवारी टेबल टेनिसपटू भाविना पटेल ( Bhavina Patel) हिनं ऐतिहासिक कामगिरी करताना C4 गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलं. भारताचेही असेच ५४ शूर टोक्योत दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षाही उंचावल्या आहेत. पण, सध्या टोक्योत एका व्यक्तिची जोरदार चर्चा रंगली आहे. भारताच्या भाविनानं व्हिलचेअरवर बसून सुरेख टेबल टेनिस खेळताना माजी विजेत्याचे आव्हान संपुष्टात आणले. पण, हाच खेळ एक अवलिया तोंडाच्या साहाय्यानं खेळतो.
इजिप्तचा इब्राहिम हॅमाड्टो ( Ibrahim Hamadtou ) हा सध्या टोक्योत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही हात नसल्यानंतर टेबल टेनिस खेळणे किती अवघड आहे, याचा फक्त विचार करून बघा.. लहान चेंडू असला तरी त्याचा वेग इतका असतो की तो परतावून लावताना चपळता लागते अन् अशा खेळात हातानं अपंग असलेल्या खेळाडूचा तग लागणे म्हणजे अवघडच. पण, इब्राहिमनं ही अशक्य गोष्ट करून दाखवली आहे. १० वर्षांचा असताना ट्रेन दुर्घटनेत इब्राहिमला दोन्ही हात गमवावे लागले. तरीही त्यानं टेबल टेनिसपटू बनण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यालाही या खेळातील बारकावे समजावून घेण्यात आणि त्या आत्मसात करण्यात अपयश आले. पण, तो खचला नाही.
टोक्योत दक्षिण कोरियाविरुद्धच्या पार्क हाँग-क्यूविरुद्धच्या सामन्यात C6 गटात त्याला पराभव पत्करावा लागला. पण, त्याच्या धाडसाचे सर्वच कौतुक करत आहेत. इब्राहिम म्हणाला,''मी या पराभवानं दुःखी आहे, परंतु मला आशा आहे की मी पुढील सामना जिंकेन.''