ऑनलाइन लोकमत
गॉल, दि. 13 - क्रिकेटमध्ये सध्या डिआरएसचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत यावरून वाद सुरू आहे तर श्रीलंका-बांगलादेश मालिकेत डीआरएसचा मुद्दा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
श्रीलंकेविरूद्ध गॉल कसोटीमध्ये झालेल्या एका प्रकारामुळे सर्वजण हैराण झाले. या सामन्यात बांगलादेशाचा सलामीचा फलंदाज सौम्या सरकार श्रीलंकेचा पार्टटाइम बॉलर असेला गुणारत्ने याच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला. पण बोल्ड झाल्यावर त्याने आश्चर्यकारकरित्या डिआरएस मागितला. त्याच्या या निर्णयावर कॉमेंटेटर्स, अंपायर ,श्रीलंकेची टीम आणि मैदानातील प्रेक्षकही हैराण झाले. खरंतर आपल्याला कॅच आउट देण्यात आलं असं सरकारला वाटलं होतं.
या घटनेनंतर सौम्या सरकारची ट्विटरवर चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे. याच सामन्यात आणखी एक अशीच घटना घडली. बांगलादेशचा गोलंदाज सुभासीष रॉय आपल्या गोलंदाजीवर लंकेचा फलंदाज कॅच आउट झाल्याचा जल्लोष करत होता पण कॅच घेताना फिल्डरने बाउंड्रीची रेषा ओलांडली होती. यानंतर सोशल मीडियावर सुभासीष रॉयचीही खिल्ली उडवली जात आहे.