ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 17 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या पाकिस्तान विरुद्ध होणा-या फायनलसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून, देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काहीवर्षांपासून मी या परिस्थितीतून जातोय. जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा या गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात असे कोहलीने सांगितले.
लोकांना आमच्याकडून अपेक्षा असणार. आम्ही प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करावी अशी लोकांची अपेक्षा असते. पण प्रत्येकवेळी हे शक्य नाही हे खेळाडू म्हणून मला समजते. मैदानावर काही गोष्टी घडतात काही घडत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. मैदानावर जी कामगिरी करायचीय त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे विराट म्हणाला.
लोकांच्या अपेक्षांचा कसा सामना करायचा त्यावर तुम्ही मार्ग शोधला पाहिजे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. तुम्हाला त्यात संतुलन राखता आले पाहिजे असे कोहली म्हणाला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले असले तरी, मागची कामगिरी जास्त महत्वाची ठरत नाही असे विराट म्हणाला.
काही संघ आत्मविश्वासाने सुरुवात करतात. काही संघ जोरदार पुनरागमन करतात. पाकिस्तानने अशीच जोरदाप पुनरागमनाची कामगिरी केली आहे असे विराट म्हणाला. त्यांचा दिवस असेल तर ते कोणालाही पराभूत करु शकतात. पण आमचा आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.
दोन्ही संघांना चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, उद्या सर्व खेळाडूंचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. ठराविक एक विचार डोक्यात ठेऊन आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय, आम्ही तशाच प्रकारचे क्रिकेट अंतिम सामन्यातही खेळू असे विराट म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या हॉकी सामन्यासाठी विराट कोहलीने भारतीय हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा.
#WATCH: Virat Kohli addresses the media ahead of India vs Pakistan match tomorrow #ChampionsTrophyhttps://t.co/Oz4Nxze0r5— ANI (@ANI_news) June 17, 2017