ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ओव्हलवर भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर स्टेडियममधील पाकिस्तानी चाहत्यांना भलताच जोश चढला होता. विजयाच्या उन्मादात बेभान झालेल्या या पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय संघाला जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न केला. भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये अनेकदा खेळापेक्षा भावना अनावर होतात. सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा आटोपून भारतीय खेळाडू पॅव्हेलियनकडे परतत असताना एका पाकिस्तानी पाठिराख्याने जाणीवपूर्वक भारतीय संघाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.
"अकड टूट गई है तेरी कोहली, अकड टूट गई हे " अशी घोषणा या चाहत्याने दिल्या. पण कोहलीने त्याला प्रत्युत्तर दिले नाही. पण मोहम्मद शामीला मात्र स्वत:वर संयम ठेवता आला नाही. "बाप कौन है" अशी घोषणा जेव्हा या चाहत्याने अनेकदा दिली. तेव्हा शामीचा पारा चढला. शामी पॅव्हेलियनकडे परतत असताना तो मध्येच थांबला व त्या चाहत्याच्या दिशेने गेला पण तेवढयात महेंद्रसिंह धोनी मध्ये पडला. त्याने शामीला शांत केले व पॅव्हेलियनकडे घेऊन गेला.
ब-याचवर्षांनी पाकिस्तानने भारतावर एक मोठा विजय मिळवल्याने पाकिस्तानी चाहते, तिथली मीडिया यांना प्रचंड गुर्मी आली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा अँकर आमीर लियाकत याने विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. लियाकत याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करत असताना भारतीयांचाही उल्लेख करत असभ्य टिप्पणी केली.
आणखी वाचा
आमीर लियाकतने भारतीय संघावर निशाणा साधताना म्हणलं आहे की, "मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलू इच्छितो की, तुम्ही जे पाकिस्तानचं पाणी रोखून ठेवलं आहे त्यात जाऊन बुडून मरा. ओंजळीभार पाणी नाही तर किमान पाकिस्तानचं रोखण्यात आलेल्या पाण्यात जाऊन बुडा". यासोबतच लियाकतने काश्मीरमध्ये घरा-घरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले जात असल्याचा दावा केला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही इंग्लंडमध्ये पाकिस्तानी चाहत्यांचा असभ्यपणा सहन करावा लागला. गांगुलीच्या कारभोवती पाकिस्तानी चाहत्यांनी गराडा घातला होता. त्यांनी पाकिस्तानच्या विजयाची घोषणा देण्यास सुरूवात केली. गांगुलीला पाकिस्तानी झेंडे दाखवू लागले. कारमध्ये असलेल्या गांगुलीने अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. तो कारमध्येच बसून पाकिस्तानी चाहत्यांना प्रत्युत्तर न देता निघून गेला.