ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 17 - उद्या भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळू असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सर्फराजने आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी हे संघासाठी चांगेल चिन्ह असल्याचे त्याने सांगितले.
फहीम अश्रफ, रुमान रईस आणि फाखार झामान या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पाकिस्तानी संघ मॅच फिक्सिंग करुन अंतिम फेरीत पोहोचलाय या आमिर सोहेलच्या आरोपाबद्दल विचारले असता सर्फराजने आम्ही आता या गोष्टीचा विचार करत नाहीय असे उत्तर दिले.
आम्ही आतापर्यंत आक्रमक क्रिकेट खेळलोय. उद्याच्या सामन्यातही तुम्हाला आमची अशीच कामगिरी दिसेल असे त्याने सांगितले. पाकिस्तानच्या मधल्या फळीच्या कामगिरीवरही त्याने समाधान व्यक्त केले. पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव झाल्यानंतर संघाने अंतिम फेरीत जी धडक मारली त्याचे श्रेय सर्फराजने गोलंदाजांना दिले.
दरम्यान कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या पाकिस्तान विरुद्ध होणा-या फायनलसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून, देशावासियांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे ओझे कसे हाताळायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे असे कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काहीवर्षांपासून मी या परिस्थितीतून जातोय. जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा या गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात असे कोहलीने सांगितले.
लोकांना आमच्याकडून अपेक्षा असणार. आम्ही प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करावी अशी लोकांची अपेक्षा असते. पण प्रत्येकवेळी हे शक्य नाही हे खेळाडू म्हणून मला समजते. मैदानावर काही गोष्टी घडतात काही घडत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. मैदानावर जी कामगिरी करायचीय त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे विराट म्हणाला.
#WATCH: Pakistan Captain addresses the media ahead of India vs Pakistan final tomorrow #ChampionsTrophyhttps://t.co/KPFMXDoKG4— ANI (@ANI_news) June 17, 2017