ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. १८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीने पदक मिळवल्याची आनंदाची बातमी समजताच प्रशिक्षक ईश्वर सिंह दाहीया यांच्या डोळयासमोर काही क्षणांसाठी १० वर्षाच्या त्या निरासग साक्षीचा चेहरा आला. साक्षी पहिल्यांदा तिची आई सुदेश मलिक सोबत रोहतकच्या सर छोटू राम कुस्ती प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आली होती.
रोहतक जवळच्या छोटयाशा मोखरा गावातील या मुलीने आज इतिहास रचला. वयाच्या १० व्या वर्षापासून साक्षीने ईश्वर सिंह दाहीया यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव सुरु केला. त्यावेळी साक्षीची आई सुदेश तिला नियमित कुस्ती प्रबोधिनीमध्ये घेऊन यायची. कुस्तीचे डावपेच शिकताना साक्षीने मुलांसोबतही सराव केला. आज दशकभराची खडतर मेहनत ऑलिम्पिक पदकाने अखेर फळाला आली.
साक्षीचे प्रशिक्षक ईश्वर सिंह दाहीया १९९३ सालापासून रोहतकमध्ये कुस्तीपटूंना प्रशिक्षण देत आहेत. साक्षीने करीयरमधील महत्वाचे पदक साल २००६ मध्ये आशियाई ज्युनियर स्तरावर मिळवले. त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिचा वरिष्ठ कुस्तीपटूंच्या शिबीरात समावेश करण्यात आला.
साक्षी पहिल्यांदा प्रबोधिनीमध्ये आली तेव्हा ती नर्व्हस होती. पण प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर तिच्यातला तो नर्व्हसनेस गायब झाला. २००७ मध्ये मी तिला वरिष्ठ कुस्तीपटूंच्या शिबीरात तिला सहभागी करुन घेण्याची विनंती केली. पण ज्युनियर कुस्तीपटू असल्यामुळे हे शक्य नव्हते पण तिला गीता फोगट, अनिता यांच्यासोबत सरावासाठी सहभागी करुन घेतले. त्यामुळे तिला आत्मविश्वास मिळाला. जेव्हा ती रोहतकला यायची तेव्हा सीनियर शिबीरातील गोष्टी सांगायची अशी आठवण ईश्वर सिंह दाहीया यांनी सांगितली.
२०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत साक्षीने रौप्यपदक मिळवले. मे महिन्यात इस्तंबुलमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केले. रोहतकच्या कुस्ती प्रबोधिनीत पुरुषांबरोबर महिलांना प्रशिक्षित केले जाते. सुरुवातीला महिलांच्या प्रवेशाला विरोध झाला होता. पण खेळाडूंनी महिलांच्या समावेशाला पाठिंबा दिला आता इथे पुरुष आणि महिला दोघांना प्रशिक्षित केले जाते.