रिओ : जिम्नॅस्ट दीपा करमाकरला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर, भारतीयांच्या सर्व आशा अॅथलेटिक्समध्ये ३००० मीटर स्टिपचेस प्रकारात ललिता बाबरकडे लागल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत ललिता तब्बल १०व्या स्थानी राहिल्याने पुन्हा एकदा भारतीयांच्या पदरी निराशाच आली. शिवाय ललिताच्या कामगिरीवर खास करून महाराष्ट्रामध्ये विशेष चर्चा होती. मात्र, अंतिम फेरीत तिचा काहीच निभाव न लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला.साताऱ्याची ललिता अॅथलेटिक्स फायनलमध्ये पोहोचणारी पी. टी. उषा यांच्यानंतर केवळ दुसरीच धावपटू ठरली होती. उषा यांनी १९८४ लॉस एंजेलिस आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये तिने २२.७४ सेकंदाची वेळ नोंदवत दहावे स्थान मिळवले. त्याच वेळी बहरीनची रुथ जेबेटने (८ मिनिटे ५९.७५ सेकंद) जबरदस्त वर्चस्व राखताना सहज सुवर्ण पटकावले, तर केनियाच्या हीविन कियेंग जेपकेमोई (९:०७.१२) आणि अमेरिकेच्या एमा कोबर्न (९:०७.६३) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. ललिताने चांगली सुरुवात करताना एक वेळ अव्वल ५ मध्ये स्थान मिळवले होते. मात्र, नंतर तिची पिछेहाट झाली, तसेच चौथ्या फेरीपासून रुथने आघाडी घेत, आपला इरादा स्पष्ट केला आणि अखेरपर्यंत आपली आघाडी कायम राखताना सहज बाजी मारली. दुसरीकडे ललिता मात्र, पुढे येण्यासाठी झगडताना दिसली. रणजीत माहेश्वरीला तिहेरी उडीच्या पात्रता फेरीत खूप मागे राहिल्याने त्याला ३०व्या स्थानी समाधान मानावे लागले. माहेश्वरीची सर्वोत्कृष्ट उडी १६.१३ मीटर पर्यंत मर्यादित राहिली. विशेष म्हणजे, अंतिम फेरी गाठलेला अखेरचा १२वा खेळाडूने १६.६१ मीटरची उडी घेत, अंतिम फेरी निश्चित केली. (वृत्तसंस्था)