ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉटने मैदानात भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवतो. कोणताही चेंडू मैदानाबाहेर मारण्याची धोनीची क्षमता आहे. पण क्रिकेटच्या मैदानात हवा तसा वावर करणारा महेंद्रसिंग धोनी डान्स फ्लोअरवर येतो तेव्हा काय होतं...त्यातही त्याच्यासमोर डान्सिंग देवा प्रभू देवा असेल तेव्हा काय होईल याचा विचार करा. जास्त विचार करण्याची गरज नाही, त्यापेक्षा व्हायरल होत असलेला व्हिडीओच पहा.
धोनी आणि प्रभू देवाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये धोनी प्रभू देवाच्या तालावर नाचत आहे. एका जाहिरातीच्या निमित्ताने शूट करण्यात आलेल्या व्हिडीओत प्रभू देवा धोनीला डान्स शिकवताना दिसत आहे. दोघांनी लुंगी घातली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे दोघांच्या स्टेप्स असून धोनीला डान्स करायला चांगलंच जमत आहे.
धोनीने याआधीही आपल्या आयपीएल संघ पुण्याच्या खेळाडूंसोबत एका जाहिरातीसाठी डान्स केला आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी डान्स म्हणजे एखादा सहज शॉट मारण्यासारखं झालं आहे.
मुंबईचा पराभव करत पुणे संघाने अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क केलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये सात वेळा अंतिम सामना खेळणारा धोनी पहिलाच खेळाडू ठरला आहे. हे फक्त दहावे पर्व असल्याने धोनीचा हा विक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
याआधी धोनीच्या नेतृत्तवाखाली चेन्नई संघाने 2008, 2010, 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी आयपीएल चषक जिंकला होता. यावेळी मात्र तो पुणे संघाकडून खेळताना दिसणार आहे.