मुंबई - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या 5 दिवसांत सलग 15 हजारांपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. तसेच, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये कोरोना नियमावलीचे कडक पालक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पाश्चिमात्य देशात अद्यापही कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याचे त्यांनी सांगितलं. तर, मास्क हीच आपली ढाल असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे, कोरोनामुळे मास्कपासून कुणाचीही सुटका नाही, मग तुम्ही स्टार खेळाडू रोनाल्डोही असाल.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमावली कडक करण्यात आली असून विनामास्क फिरल्यास दंडही आकारण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. पुणेपोलिसांनी यासंदर्भात एका चांगला व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे पुणेपोलिसांनीट्विटर अकाऊंटवरुन ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, स्टार फुलबॉल प्लेअर रोनाल्डो हा मैदानात बसला असून त्याच्या तोंडावर मास्क नाही. त्यावेळी, तेथील महिला कर्मचारी रोनाल्डोजवळ जाऊन त्यास मास्क परिधान करण्याची सूचना करते. त्यानंतर, रोनाल्डो आपल्या चेहऱ्यावर मास्क परिधान करतो.
मास्क बंधनकारकच, मग तुम्ही रोनाल्डो असाल तरी... असे ट्विट पुणे पोलिसांनी केलंय.
फेब्रुवारी महिन्यात वाढली रुग्णसंख्या
देशभरात 31 डिसेंबर रोजी 2 लाख 52 हजार 701 रुग्ण एक्टीव्ह होते, पण 31 जानेवारी रोजी ही रुग्णसंख्या घटून 1 लाख 65 हजार 715 पर्यंत पोहोचली होती. रुग्णसंख्या कमी होण्याची हीच सरासरी फेब्रुवारी महिन्यात राहिली असती तर हा आकडा 80 हजारांपर्यंत आला असता. रविवारी देशात 15,614 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,291 लोक बरे झाले असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 1.07 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 57 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत देशभरात 1.65 लाक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील 6 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला आहे.
महाराष्ट्रात रविवारी 8,293 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 3753 रुग्ण बरे झाले असून 62 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत 21 लाख 55 हजार 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी, 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 52 हजार 154 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत 77 हजार 8 रुग्णांवर उपचार सुरू आहे. महाराष्ट्रासह 6 राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, पण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.