भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं अद्याप आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस असून विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन बाजू समजून घेतली. आता कुठे हा प्रश्न मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय.
दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर बजरंग पुनियाने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित कुस्तीपटूंनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केले आहेत.
बुधवारी मध्यरात्री दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यात महिला कुस्तीपटूंना शिविगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला आहे.